बरेचदा नवोदित कलाकरांना सिनेमाविश्वात तग धरायला वेळ लागतो. तर काही कलाकारांचं नशीब हे अल्पावधीत उजळत. पदार्पणातच हे कलाकार एकतर नाव कमावतात किंवा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांचं मन जिंकण्यास अयशस्वी ठरतात. कलावंत हा कधीच हार मानत नाही. प्रत्येक कलाकार हा आपल्या नशिबावर, आपल्या मेहनतीवर यश संपादन करतो. पहिल्या पदार्पणात लोकप्रियता मिळवणारी अशीच एक सोज्वळ, साधी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल.(Alka Kubal shooting Incidence)
‘लेक चालली सासरला’ या चित्रपटातून अलका कुबल यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यावेळी कोणाला वाटलं ही नसेल की, एवढीशी मुलगी इतकी मोठी स्टार बनेल. मात्र अलका यांनी कुणीही गॉडफादर नसताना केवळ स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अलकाने अक्षरशः शून्यातून स्वतःच विश्व निर्माण केलं.
अलका कुबल यांनी सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा (Alka Kubal shooting Incidence)
‘लेक चालली सासरला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा ललिता ताम्हाणे यांनी सांगितलाय. ‘लेक चालली सासरला’ चित्रपटाच्या वेळी अण्णासाहेब देऊळगावकर यांनी अलका यांच्याशी केवळ पाच-दहा मिनिटं बोलल्यावर लगेच त्यांची त्या भूमिकेसाठी निवड केली होती. त्यांची स्क्रीन टेस्ट घेण्याचीही त्यांना गरज वाटली नव्हती. अलका यांनीही त्यांचा विश्वास सार्थ ठरवून ती भूमिका कसोशीने निभावली होती. नवपरिणित, सोशिक, सालस, निरागस सून. अलका यांना त्या चित्रपटात फारसे संवादच नव्हते. पण अलका नुसत्या डोळ्यांनीच बोलल्या होत्या.
हे देखील वाचा – पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम यांना नानांनी सावरलं
त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्यक्ष काही न बोलताही बरंच काही सांगून गेले होते… अलका यांच्या संयमपूर्ण अभिनयामुळे सासूच्या आणि नवऱ्याच्या खलनायकी भूमिकांना अधिकच उठाव आला होता. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळचा एक प्रसंग अलका यांच्या चांगलाच लक्षात राहिला होता. अलका यांना स्टुलावर चढून लोणच्याची बरणी काढायची होती. चुकून ती बरणी त्यांच्या हातून खाली पडते आणि फुटते.(Alka Kubal shooting Incidence)
शशिकलाबाई म्हणजे त्यांची सासू तावातावाने आत येते आणि रागाने तिचे केस धरून ओढते, तशीच केसांना धरून त्यांना फरपटत हॉलमध्ये घेऊन जाते, असा प्रसंग होता. शूटिंग चालू असताना शशिकलाबाईंनी इतक्या जोराने त्यांचे केस ओढले होते, की अलका यांना खरोखरच रडायला आलं होतं. शशिकलाबाईंनी मुद्दाम केलं नसलं, तरी जोरात केस ओढल्यामुळे अलका यांचं डोकं इतकं दुखायला लागलं होतं, की नंतर त्या किती तरी वेळ रडत होत्या. अलका यांनी नंतर अण्णासाहेबांना चेष्टेने म्हटलंही होतं-‘“याच्या पुढच्या चित्रपटात सून सासूचे केस ओढते, असा प्रसंग असला पाहिजे. मी सून आणि शशिकलाबाई सासू. म्हणजे मला आजची चांगली परतफेड करता येईल. “