झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी. या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या या जोडीने खऱ्या आयुष्यातदेखील एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यानंतर हे दोघेही त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. नुकताच काल (१५ जानेवारी) रोजी देशभरात सर्वत्र मकरसंक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला आणि त्यांच्या या पहिल्या मकरसंक्रांतीनिमित्त त्यांनी खास सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळालं. (Akshaya Deodhar And Hardik Joshi On Instagram)
हार्दिक व अक्षया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. दोघेही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज मकरसंक्रांत आहे आणि लग्नानंतर ही अक्षयाची पहिलीच संक्रांत आहे. त्यानिमित्त तिने तिच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षया हार्दिकला तिळगूळ खायला देतानाचा खास क्षणदेखील टिपला गेला आहे.
या खास फोटोमध्ये अक्षयाने काळ्या रंगाची काठा पदराची साडी परिधान केली आहे. काळ्या रंगाच्या या साडीला सोनेरी व मेहेंदीच्या रंगाचा मोठा काठदेखील आहे. अक्षयाने परिधान केलेल्या डिझायनर ब्लाऊजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तर तिने गळ्यात घातलेले हलव्यांचे आकर्षक दागिनेही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच तिने नाकात सुंदर नथदेखील घातली आहे. तर हार्दिकनेदेखील काळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर सोनेरी रंगाचा काठ असलेला धोतर परिधान केला आहे. त्याचबरोबर त्याने गळयात हलव्याच्या दागिन्यांचा डिझाइनर हार घातला आहे.
दरम्यान, अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहते तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पाठकबाई-राणादा खूपच सुंदर’, ‘पाठकबाई छान दिसत आहात’, ‘तुमची साडी खूप सुंदर आहे’, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत. तसेच हार्दिक होस्ट करत असलेल्या ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्येही अक्षयाने संक्रांतीनिमित्त हजेरी लावली होती. यावेळीदेखील हार्दिक व अक्षया या दोघांनी संक्रांतीचा खास लूक केल्याचे पाहायला मिळाले होते.