दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बराच चर्चेत राहिला. चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सहा बहिणींच्या आणि एकूणच महिलांच्या भावविश्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सहा बहिणींभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाने महिलांसह पुरुष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या अभिनेत्रींच्या सुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आलं. (Baipan Bhari Deva Movie)
३०जून रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा कित्येक दिवस सिनेमागृहात तग धरून होता. चित्रपटाच्या दमदार कथानकामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७५ कोटींहून अधिक गल्ला जमावला. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही या चित्रपटाची क्रेझ कायम होती. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन जवळपास तीन ते साडेतीन महिने उलटून गेल्यावरही या चित्रपटाची क्रेझ अजूनही कायम आहे. चित्रपटातील कथानकाने व चित्रपटातील गाण्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. याची प्रचिती नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान आली.
महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या पाथर्डी येथील कार्यक्रमातील एक झलक इंस्टाग्रामवर पाहायला मिळाली. आदेश बांदेकर सूत्रसंचालनासाठी रंगमंचाच्या मध्यभागी उभे असताना समस्त महिला वर्ग ‘बाईपण भारी देवा’चं टायटल साँग गाताना दिसला. इतकंच नव्हे तर हजारो महिलांनी या गाण्यावर ठेकाही धरला. ‘बाईपण भारी देवा’ फेम शिल्पा नवलकर यांनी आदेश बांदेकरांच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ शेअर केला. या स्टोरीमध्ये त्यांनी चित्रपटाची क्रेझ आजही असल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, “अभूतपूर्व! ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.”

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील गाणी आजही महिलांच्या मनात घर करून आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला वा सणा सुदीला समस्त महिलावर्ग या गाण्यांवर ठेका धरल्या वाचून राहत नाहीत. हे खरं चित्रपटाचं आणि चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचं यश आहे.