अभिनयक्षेत्रात काम करत असताना आज कित्येक कलाकार समाजकार्य करताना दिसतात. समाजकार्याबाबत प्रबोधन करणं हा त्यांचा यामागचा मोठा उद्देश असतो. गरजुंना, पाळीव प्राण्यांना मदत करणं अनेक कलाकार मंडळींना आवडतं. त्यापैकीच एक म्हणजे जुई गडकरी. जुई सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत काम करताना दिसत आहे. पण आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत ती समाजकार्यही करत आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्रामद्वारे एक व्हिडीओ शेअर करत तिच्या समाजकार्याबाबत माहिती दिली. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं तोंड भरुन कौतुक करत आहेत. (Jui Gadkari Social Work)
जुई दरवर्षी एका अनाथाश्रमात दिवाळी साजरी करते. अनाथाश्रमातील मुलं, आजी-आजोबा यांच्याबरोबर आनंदाचे क्षण घालवते. गेली १९ वर्ष ती हा उपक्रम राबवत असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ती हा उपक्रम राबवणार आहे. त्यासंबंधीची माहिती तिने व्हिडीओद्वारे दिली आहे. जुईला ओळखणाऱ्या अनेक मंडळींना तिच्या या समाजकार्याबाबत ठाऊक आहे. पण तिच्या चाहतावर्गामध्ये नव्याने वाढ झाली आहे. त्यांनाही या उपक्रमाची माहिती असावी म्हणून तिने व्हिडीओ शेअर करण्याचं ठरवलं.
जुई या व्हिडिओमध्ये म्हणाली, “नमस्कार, बरीच वर्ष जे इन्स्टाग्रामला मला फॉलो करतात त्यांना ही गोष्ट माहित आहे. माझ्या दरवर्षीच्या दिवाळीला पनवेलमधील नेरेगाव येथील शांतिवन आश्रमातून सुरुवात होते. तिथे मी माझ्या मित्रांसह दरवर्षी जाते. यंदाचं हे माझं १९वं वर्ष आहे. आम्ही ज्या आश्रमात जातो, तिथे कुष्ठरोगाने ग्रस्त असलेले रुग्ण, निराधार आजी-आजोबा आहेत. त्याचबरोबर एक वृद्धाश्रमदेखील तिथे आहे. तर मी माझ्या मित्रांसह जेव्हा तिथे जाते, तेव्हा आम्ही ते आश्रम सजवतो, त्यांच्याबरोबर जेवतो, छान नृत्य व गाण्याचे कार्यक्रम होतात. आम्ही आमच्या दिवाळीची सुरुवात त्यांच्याबरोबर करतो”.
हे देखील वाचा – प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, ओंकार भोजनेच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष
पुढे ती म्हणाली, “आम्ही त्या आश्रमाला देणगीही देतो. जेणेकरून तिथल्या लहान मुलांना, आजी-आजोबांना आणि रुग्णांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपयोग होतो. तर जमेल तसे पैसे जमा करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आमचा काही आग्रह नसतो की, तुम्ही इतकीच मदत दिली पाहिजे. गेली अनेक वर्ष मला फेसबुक-इंस्टाग्रामवरून काही लोक मदत करतात, देणगीसाठी हातभार लावतात”. जुईने या सामाजिक उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केलं आहे. तसेच ती हेदेखील म्हणाली की, “मी तुम्हाला खात्री देते की तुमच्या मदतीचा गैरवापर होणार नाही. चांगल्याच कामासाठी नक्कीच याचा वापर होईल”.
हे देखील वाचा – रडली, आरोप केले अन्…; ‘बिग बॉस १७’च्या घरात जाताच अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यामध्ये बिनसलं, म्हणाली, “नवीन लोकांना भेटल्यावर तो…”
हे काम करण्यामागचा हेतू सांगताना ती म्हणाली की, “आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी एक दिवस द्यायला हरकत नाही. त्यांचे आशीर्वाद घेऊन मग आमचं पुढचं वर्ष खूप छान जातो. त्यामुळे आम्हाला हे आशीर्वाद खूप गरजेचे असतात. गेली १९ वर्ष मी तिथे जाते आणि सातत्याने त्यांच्याबरोबर वसुबारस साजरा करते. आम्हाला विश्वास बसत नाही की, वर्षभर ते या दिवसाची वाट पाहतात. कारण बाकी कोणीच त्यांना आपलंसं करत नाही. त्यामुळे असं वाटतं की, आपण का नाही त्यांना जवळ करायचं ज्याचं कोणीच नाही?”. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून चाहत्यांनी जुईवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “किती छान काम करता तुम्ही. खरंच अभिमान वाटतो की, जगात अजूनतरी माणुसकी शिल्लक आणि आपुलकी आहे” अशा शब्दांमध्ये अनेकांनी जईचं कौतुक केलं.