69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील एका ग्रुप फोटोमधून करण जोहरला क्रॉप करून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अग्निहोत्रीने करण जोहरच्या चित्रपट शैलीबद्दल जाहीरपणे व्यक्त केलेल्या नापसंतीमुळे ही चाल चालली असल्याचं बोललं जात आहे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान समारंभात विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. तर करण जोहर निर्मित ‘शेरशाह’ या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनीही उपस्थिती दर्शविली होती. (Vivek Agnihotri Viral News)
विवेक अग्निहोत्री यांनी करण जोहरच्या चित्रपटांबद्दल त्यांचे मत उघडपणे व्यक्त केले आहे. याआधी विवेक यांनी करणवर असाही आरोप केलेला की, त्याने सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांची दिशाभूल केली आहे. विवेक अग्निहोत्रीने सोशल मीडियावर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमवेत ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे विजेते ठरलेल्यांबरोबरचे फोटो शेअर केले.
या फोटोमध्ये विवेक अग्निहोत्री, त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी, तसेच आलिया भट्ट, आर माधवन, एसएस राजामौली, अल्लू अर्जुन, क्रिती सॅनन, वहिदा रहमान आणि श्रेया घोषाल यांसारख्या चित्रपट उद्योगातील इतर प्रमुख पाहायला मिळाले. विवेक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये सर्वजण दिसत असले तरी या फोटोमधून करण जोहर क्रॉप झाला आहे. करणचा चेहरा अगदी नाममात्र दिसतो आहे. विवेक यांनी पोस्ट केलेल्या या फोटोची विशेष चर्चा झाली.
Such talent. Women power. #NationalAwards pic.twitter.com/yrsSwxGpBO
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 17, 2023
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यांनतर काल दिनांक १७ ऑक्टोबर रोजी या पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्ली येथे दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘पुष्पा’ सिनेमासाठी अल्लू अर्जुनने पटकावला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार क्रिती सेनॉन हिला ‘मिमी’ या चित्रपटासाठी आणि आलिया भट्ट हिला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी मिळाला. विवेक यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये हे कलाकारदेखील पाहायला मिळत आहेत.