‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील गौरी व शिवच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. तर या जोडीचा आजही एक वेगळा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो. अभिनेता ऋषी सक्सेना व अभिनेत्री सायली संजीव या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. या मालिकेतून ऋषीला खरी ओळख मिळाली असून तो घराघरात पोहचला. (Rishi Saxena New serial)
या मालिकेबरोबरच ऋषी ‘पावनखिंड’,’फत्तेशिकस्त’ या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. या मालिकेनंतर ऋषी हा हिंदी मनोरंजन विश्वात कार्यरत होता. काहे दिया परदेश या मालिकेनंतर ऋषी तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. ऋषी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
ऋषी सक्सेनाची ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत एन्ट्री होणार आहे. या मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मिहीर शर्मा हा उत्तम शेफ असतो. मिहीरची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गायनाचे धडे गिरवताना दिसणार आहे. मालिकेत ऋषीच्या येण्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे.
सिनेसृष्टीत सक्रिय असणारा ऋषी त्याच्या वैयक्तिक कारणामुळेही चर्चेत असतो. ऋषी व ईशा केसकर यांच्या नात्याची तर सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. इशा सध्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. ते दोघे नेहमी एकमेकांबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय एकमेकांच्या कामाचं कौतुक देखील करत असतात. आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेत ऋषीची ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहणं प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे.