मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमातून त्यांनी अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील वंदना यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. याशिवाय वंदना यांच्या ‘चारचौघी’ या नाटकानेही रंगभूमी गाजवलेली पाहायला मिळत आहे. शुटींगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून त्या मनसोक्त त्यांचं आयुष्य जगताना नेहमीच पाहायला मिळतात. (Vandana Gupte Wedding Anniversary)
सोशल मीडियावरही वंदना गुप्ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वंदना यांनी शेअर केलेली ही पोस्ट त्यांच्या पतीसाठी आहे. आज वंदना गुप्ते व शिरीष गुप्ते यांच्या लग्नाला ५१ वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
वंदना यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांचा लग्नातील फोटो व आताचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे. या फोटोखाली कॅप्शन देत त्यांनी “आमच्या लग्नाचा ५१वा वाढदिवस आहे. आम्ही एकत्र इतकी वर्षे घालवली यावर विश्वासच बसत नाही. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषने दिलेला पाठिंबा माझ्या यशाचा कणा होता. मनोरंजन उद्योगात ५२ वर्षे. गृहिणी व थिएटर ॲक्टिव्हिटीज या नात्याने बांधिलकीची मागणी करणारा वेळ हाताळणे सोपे नाही. सर्व गोष्टींसाठी शिरीष धन्यवाद”, असं म्हटलं आहे.
वंदना यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्यावर्षी लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त वंदना गुप्ते पती शिरीष गुप्ते यांच्यासह विवाहबंधनात अडकल्या. लग्नाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त दोघांनी त्यांचा छोटेखानी विवाह सोहळा उरकला. सर्व कुटुंबियांच्या साक्षीने त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.