‘बिग बॉस १६’ मधील स्पर्धक म्हणून सर्वांची मनं जिंकणारे शिव ठाकरे व अब्दु रोजिक एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहेत. शिव व अब्दू यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने साक्षीदार म्हणून समन्स बजावले असल्याचं समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर प्रकरणात अली असगर शिराझी याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. ड्रग माफिया अली असगर याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार म्हणून शिवला बोलावण्यात आलं आहे. (Abdu Rozik And Shiv Thakare Summoned By Ed)
शिव ठाकरे व अब्दू रोजिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहेत. एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात साक्षीदार म्हणून दोघांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अली असगर शिराझी ‘हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी चालवत होते आणि ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना वित्तपुरवठा करत असे.
शिव ठाकरेच्या ‘ठाकरे टी अँड स्नॅक्स’ या खाद्यपदार्थ व स्नॅक्स रेस्टॉरंटशिवाय,अब्दु रोजिकच्या फास्ट फूड स्टार्ट-अप ‘बुर्गीर’ ब्रँडसाठीही त्याने वित्ततपुरवठा केला होता. शिव ठाकरे बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात सहभागी झाला होता. हा शो संपल्यानंतर त्याने ‘ठाकरे टी अँड स्नॅक्स’ अशा नावानं एक व्यवसाय सुरु केला होता. यासाठी हसलर हॉस्पिटॅलिटीकडून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. पण काही महिन्यांत अली असगर शिराझीचं ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर शिव ठाकरेने हा करार रद्द केल्याचं म्हटलं जात आहे.
एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया व ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेनं गेल्या वर्षी अली असगर शिराझी याला अटक केली आहे. अलीच्या या कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसा कमावल्याचे आरोप आहेत. हे पैसे त्यांना हसलर्स हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून देण्यात आले असून शिराझी यांनी स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.