Actor Atul Parchure Passes Away : ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. तीन वर्षांपूर्वी अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता, कर्करोगावर मात करुन ते बाहेर आले होते. मात्र गेले काही दिवस ते आजारी होते. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा परसरली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले. असंख्य गाजलेल्या मालिका, विविध नाटके आणि चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे काळाच्या पडद्याआड झाले आहेत.
आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. यावेळी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींची गर्दी पाहायला मिळाली. कुटुंबासह उपस्थित कलाकार मंडळींनाही अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले. यावेळी अतुल यांचे खास मित्र संजय मोने यांनाही रडू आवरलं नाही. अतुल यांचे अंतिम दर्शन घेताना संजय मोने व सुकन्या मोने यांचा अश्रूंचा बांध फुटला.
संजय मोने व अतुल परचुरे यांची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासून आहे. झी मराठी नाट्य गौरव सोहळ्याला अतुल परचुरेंचा सन्मान झाला त्यावेळी संजय मोने आपल्या लाडक्या मित्रासाठी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा ते असं म्हणाले होते की, “गेली ४० वर्षे आम्ही दोघे जवळपास रोज भेटतो. जो हजर नाही, त्याच्याबद्दल वाईट बोलून आम्ही गेली ४० वर्षे घालवली आहेत. परचुरे हे वयाने आमच्यापेक्षा लहान असले तरी आम्ही त्यांना ‘साहेब’ म्हणतो आणि इतके दिवस त्यांनी ज्या जिद्दीने आजारावर मात केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना इथून पुढेही कायम ‘साहेब’च म्हणू”, असं म्हणत मोने खूपच भावुक झाले.
यापुढे अतुल परचुरे यांनी असं म्हटलं होतं की, “बरोबर एका वर्षाआधी मी उभा राहू शकेन की नाही याची मला स्वत:ला शाश्वती नव्हती. त्यामुळे मराठी रंगभूमी, प्रेक्षक, मित्रपरिवार व माझे कुटुंबीय या सर्वांमुळे मी आज नाटक इथे नाटक सादर करू शकलो. मला कुणी भेटलं किंवा नाही भेटलं हाअ मुद्दा नाही. पण सर्वांनीच माझ्यासाठी प्रार्थना केली. सगळ्यांनाचं मी बरं व्हावं असं वाटत होतं याची मला १००% खात्री होती. याकाळात माझी बायको, मुलगी व आई या तिघींनी व माझ्या अनेक मित्रांनी भोगलं आहे. आता त्यांचे आभार मानणं चुकीचे ठरेल. पण मी आज जो कुणी आहे तो त्यांच्यामुळेच आहे”.