हिंदी सिनेसृष्टीतून नुकतीच यामी गौतम प्रेग्नंट असल्याची बातमी आली होती. अशातच आता अभिनेत्री रिचा चड्ढा व अभिनेता अली फजल हेदेखील आई-वडील होणार असल्याची खुशखबर समोर येत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा चड्ढा व अली फजल यांनी २०२२ मध्ये लग्न केले आणि आता हे दोघे पालक होणार आहेत. रिचा व अली यांनी स्वत: सोशल मीडियावर एका खास पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.
रिचा चड्ढा व अली फजल यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. यामध्ये पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी “१ + १ = ३” असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये रिचा व अली यांनी त्यांचा एकत्र फोटो शेअर केला आहे. हे खास फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये असं “लहान मुलाच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्या जगात सर्वात मोठा आहे” असं लिहिलं आहे.
तसेच रिचा चड्ढाने अली फजलबरोबरचा एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एका प्रेग्नंट स्त्रीचा इमोजीही पोस्ट केला असल्याचे पाहायला मिळत आहे. रिचा-अली यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद, श्रिया पिळगावकर, हिमांशी चौधरी, नताशा भारद्वाज, हर्षित शेखर गौर यासंह अनेक कलाकार मंडळींनी व चाहत्यांनी कमेंट्सद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
आणखी वाचा – “ब्रेकअपबद्दल बोलणं…”, एक्स गर्लफ्रेंडने बदनामी केल्यानंतर भडकला अरबाज खान, म्हणाला, “२ वर्षांपूर्वीच…”
दरम्यान, रिचा चड्ढा व अली फजल यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. त्यांनी दिल्लीत त्यांच्या लग्नाचा प्री-वेडिंग सोहळा केला होता. त्यानंतर लखनऊमध्ये मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडला. मग रिचा-अलीने मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.