हल्ली तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी जितक्या सहज आणि सोप्या झाल्या आहेत, तितकेच त्यातील धोके वाढले आहेत. बेरोजगारी, महागाई यासारख्या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून काही लोकांकडून झटपट पैसे कमावण्यासाठी कोणत्याही थराला जायची वृत्तीदेखील वाढली आहे. आता तर रोज टीव्ही, वर्तमानपत्रांत फसवणूकीच्या अनेक बातम्या असतात. त्यातही सायबर क्राइमचा आकडा हा अधिकच असतो. पैसे उकळण्यासाठी अनेक प्रकारच्या नामी शक्कल लढवल्या जातात आणि याला अनेक लोक बळीही पडतात.
या अशा ऑनलाइन फ्रॉड किंवा स्कॅमचे केवळ सामान्य जनताच नाही तर सेलेब्रिटीही बळी पडतात आणि असाच काहीसा प्रकार एका मराठी अभिनेत्री व लेखिकेबरोबर झाला आहे. मुग्धा गोडबोले यांच्याबरोबर फसवणुकीचा प्रकार घडला असून यासंबंधित एक पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे त्यांनी सर्वांनाच सतर्कतेचा इशारादेखील दिला आहे.
मुग्धा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “५ फेब्रुवारीला दुपारी घडलेला प्रसंग किंवा खरं तर फ्रॉडचा प्रयत्न. मी लताबाईंवरच्या एका कार्यक्रमाच्या तालमीत होते. त्यामुळे खूप गडबड आणि मागे वाद्यांचे आवाज येत होते. अशातच मला एक फोन आला. एक माणूस हिंदी भाषेत म्हणाला की, मी तुमच्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते. ते म्हणाले की, ते पैसे मी तुमच्या अकाऊंटवर परत जमा करावेत. १२,५०० रुपये आहेत. बोलताना तो नवऱ्याच्या नावापुढे सर सर एवढंच म्हणत होता. हे शक्य आहे असं मला वाटलं.”
यापुढे त्या असं म्हणाल्या आहेत की, ”पुढे त्याने आधी १०,००० रुपये ट्रान्सफर केल्याचा मॅसेज आला आणि मग २५,००० रुपये पाठवल्याचा मॅसेज आला. त्याचवेळी माझ्या गुगल-पे अकाऊंटवरही मॅसेजेस आले. हे सगळं वाऱ्याच्या वेगाने सुरू होतं आणि मग तो माणूस म्हणू लागला की, मी चुकून २,५०० ऐवजी २५,००० ट्रान्स्फर केले आहेत. तर कृपया ते पैसे मला परत करा. मधल्या काळात मी नवऱ्याशी संपर्क केला. त्यानं सांगितलं असं काहीही नाही.”
पुढे त्यांनी म्हटले की, “आता त्याने पैसे परत करा म्हणून धोशा लावला. शेवटी मी त्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून ओरडले. त्याने माझ्या नवऱ्याच्या नंबरवर फोन केला. त्याला तो म्हणाला की मी चुकून शर्मा नावाच्या माणसाऐवजी रानडे आडनावाच्या माणसाच्या बायकोला पैसे दिले आहेत तर ते मला परत करा. माझ्या नवऱ्याने त्याच्याकडे आधारकार्ड आणि बँक स्टेटमेंटचा स्क्रीन शॉट मागवले. त्यानंतर पुढच्या मिनिटाला माझ्या कडचे मॅसेजेस डिलीट झालेले होते. पण मी स्क्रीन शॉट काढून ठेवला होता.”
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचंही ठरलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याबरोबर विवाहबंधनात अडकणार, केळवणाला सुरुवात
शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे की, ”माझ्या सुदैवाने मी ह्याला बळी पडले नाही. पण ह्याकडे लक्ष द्या. रोज नवनवीन पद्धती वापरून कुणीतरी आपल्याकडून आपले कष्टाचे पैसे चोरतो आहे. ह्यांच्याकडे माझा आणि माझ्या नवऱ्याचा नंबर होता. आम्ही समोरासमोर नसू याचा कदाचित त्याला अंदाज होता. त्यामुळे डोळे, कान आणि मेंदू २४ तास चालू ठेवणं ह्याला आता पर्याय उरलेला नाही.”