अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा नुकताच शाही विवाहसोहळा संपन्न झाला. शिवानी व अजिंक्यच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ३१ जानेवारीला थेट साखरपुड्याची खास फोटो शेअर करत शिवानी व अजिंक्यने त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. दोघांच्या साखरपुड्यातील फोटोंनी साऱ्यांना सुखद धक्का दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा सुरु होती अखेर १ फेब्रुवारीला ही जोडी लग्नबंधनात अडकली. (Shivani Surve and Ajinkya Nanaware)
ठाण्यातील येऊर हिल येथे शिवानी व अजिंक्य यांच्या विवाहसोहळा संपन्न झाला. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. शिवनीच्या ‘बिग बॉस’सीझनमधील कलाकार मंडळीही यावेळी उपस्थित होते. माधव देवचक्के, नेहा शितोळे, मेघा धाडे या कलाकारांनी हजेरी लावली. तसेच ‘झिम्मा’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट अभिनेत्रीच्या लग्नाला उपस्थित होती. लग्नसोहळ्यात या जोडप्याने पारंपरिक व रिसेप्शनला वेस्टर्न लूक केल्याचं काही व्हायरल व्हिडीओजमधून समोर आलं.
लग्नानंतर शिवानी व अजिंक्य त्यांचे लग्नांनंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. दोघेही त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून फिरायला गेले आहेत. “मला तिची पुन्हा ओळख करुन देण्याची परवानगी द्या. माझ्या पत्नीला भेटा” असं म्हणत अजिंक्यने बायकोबरोबर वेळ घालवतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. व्हिडीओवरुन दोघेही त्यांचं हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत.
शिवानी व अजिंक्यच्या या रोमँटिक व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवाय त्यांच्या या व्हिडीओला पसंती दर्शविली आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ मालिकेमुळे व ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे प्रसिद्धीझोतात आली. तर अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे.