अतिशय सोज्वळ, शालीन चेहरा, संयत अभिनय व नृत्यकौशल्य आदी कलागुणांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं गुरुवारी दीर्घ आजारपणाने निधन झालं. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. तसेच अनेकांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. (Nivedita Saraf On Seema Deo)
सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीमुळे अभिनेत्री निवेदिता सराफ देखील भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सीमा देव यांना श्रद्धांजली वाहत निवेदिता सराफ म्हणाल्या, “सीमाताई गेल्या हे कळलं आणि दोन मिनिटे स्तब्ध झाले. त्या आजारी आहेत हे माहीत होतं. पण तरीही बातमी ऐकल्यावर खूप भरुन आलं. खूप आठवणी दाटून आल्या. संसार व करीयर याचा समतोल कसा साधायचा हे मी त्यांना पाहून शिकले. त्यांच्या इतकं मला नाही जमलं. त्या माझ्या आदर्श होत्या. अतिशय प्रेमळ मृदू स्वभाव सगळ्यांना आपलसं करुन घेण्याची सवय खूप गोष्टी मी सीमाताईंकडून शिकले. देव कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.”
सीमा देव व ज्येष्ठ अभिनेते रमेश देव या जोडप्याने मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान अमुल्य आहे. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या ‘सुवासिनी’ , ‘जगाच्या पाठीवर’, ‘आनंद’ अशा अनेक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.
आज दुर्दैवाने सीमा देव आणि रमेश देव हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत. पण वेळोवेळी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. अभिनयक्षेत्रामुळे ही जोडी केवळ अभिनयानेच नाही तर दोघांनीही आपल्या सदाबहार प्रेमकहाणीने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं.