सुश्मिता सेन अभिनित ‘ताली’ या वेबसीरिजच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. तृतीयपंथी गौरी सावंत यांच्या समाजकार्याचे, तसेच खडतर जीवनप्रवासाचे वर्णन या वेबसीरिज मधून मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरिजच सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. हिंदी कलाकारांसह या वेबसीरिजमध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. दिग्दर्शक रवी जाधव तसेच लेखक क्षितिज पटवर्धन यांच्यासह अभिनेता सुव्रत जोशी, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर, हेमांगी कवी या मराठी कलाकारांना वेबसीरिजमध्ये पाहणं रंजक ठरलं. (Suvrat Joshi On Taali)
या वेबसीरिजमधील अभिनेता सुव्रत जोशीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. त्याच्या लूकची विशेष चर्चा रंगली असून त्याच्या अभिनयाचंही सगळेचजण कौतुक करत आहेत. सुव्रत जोशीची पत्नी सखी गोखले, सासू शुभांगी गोखले यांनी स्पेशल पोस्ट शेअर करत सुव्रतच्या भूमिकेचं कौतुक केलं. अशातच आता सुव्रतने सोशल मीडियावरून त्याच्या ताली या वेबसीरिजमधील अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
सुव्रतने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. यांत त्याने ताली या वेबसीरिजमध्ये त्याने साकारकलेल्या तृतीयपंथांची भूमिकेतील फोटोस शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये त्याने फोटोंसोबत वेबसीरिजमध्ये भूमिका साकारल्यानंतर त्याला काय वाटत आहे याचं शाब्दिक वर्णन केलं आहे, सुव्रतने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “अभिनय हे माझ्यासाठी स्वातंत्र्य आणि ओळख आहे. मी खरंच कृतज्ञ आहे की, मी एक कलाकार आहे. ज्यांनी मला या संधी दिल्या त्या संपूर्ण जगाचा मी आभारी आहे. यामध्ये मी माझ्या सर्व सीमा ओलांडून काहीतरी करु शकतो. आयुष्य किती कठोर असू शकत हे मी स्वतःला समजवत आहे. तसेच लोक किती शूर असू शकतात याचाही प्रत्येकाने अनुभव घ्यायला हवा.”
‘ताली’ वेबसीरिजमधील सुव्रतची मुन्ना ही भूमिका विशेष गाजली. ’दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे सुव्रतला खरी ओळख मिळाली. सुव्रतने आत्तापर्यंत अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. तर आता ‘ताली’ या वेबसीरिजमधून त्याने हिंदीत पदार्पण केले आहे.