बरेच असे कलाकार आहेत ज्यांना चित्रीकरणानिमित्त त्यांच्या घरापासून, कुटुंबापासून दूर राहावं लागतं. ही कलाकार मंडळी घरापासून दूर असली तरी त्यांचं लक्ष हे त्यांच्या घराकडे लागून राहिलेलं असतं. शिवाय घरी येण्याकडे ही मंडळी उत्सुक असतात. अशातच तब्बल दोन महिने घरापासून, कुटुंबापासून दूर असलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा घरी परतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये घरी परतल्यानंतरचा तिचा चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. ही अभिनेत्री आहे मृण्मयी कुलकर्णी. (Mrunmayee Deshpande Home)
धावपळीच्या जीवनाकडून थोडंसं दूर येत अगदी निसर्गाच्या सान्निध्यात मृण्मयीने घर घेतलं आहे. मृण्मयी देशपांडे आणि तिचा नवरा स्वप्निल राव या जोडीने महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात एक छोटसं घर काही दिवसांपूर्वी बांधलं होतं. कामानिमित्त बाहेर असलेली मृण्मयी तब्बल दोन महिन्यांनी घरी परतली आहे. घरी परतल्यावर तिने तिचा आनंद व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये मृण्मयीचा नवरा दार उघडताना दिसत आहे तर मृण्मयी दार उघडताच त्याला घट्ट मिठी मारताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मृण्मयीने ती तिच्या घराला मिस करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता ती तिच्या घरी परतली आहे. मृण्मयी तिच्या ‘ड्रीम होम’ला परतली आहे. मृण्मयीने निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेल्या घरात शेती करण्यास सुरुवात केली आहे. स्वत:साठी लागणाऱ्या भाज्या-फळभाज्यांचे ती उत्पादन याठिकाणी घेताना दिसते. सोशल मीडियावरून याचे अनेक व्हिडीओ तिने शार देखील केले होते.
महाबळेश्वरमध्ये मृण्मयी आणि तिचा नवरा स्वप्नील या दोघांनी शेती करण्यास सुरुवात केली आणि त्याठिकाणी ते रमलेही आहेत. मोकळी हवा, स्वत:साठी स्वत:च उगवलेलं अन्न, शहराबाहेरील शांतता आणि साधं राहणीमान या साऱ्याचा आनंद हे कपल याठिकाणी घेताना दिसतात. मृण्मयी अभिनयाव्यतिरिक्त निसर्गाशी जोडलेला हा व्यवसाय करत असल्याने तिच्या चाहत्यांनी व सहकलाकारांनी तिचं बरेचदा कौतुकही केलं आहे.