सोशल मीडियावर रिल स्टारची अधिकाधिक चलती असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणून काही चेहरे या काळात विशेष चर्चेत आले आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांवर ती खुलेआमपणे भाष्य करताना दिसते. मध्यंतरी अंकिता राजकीय क्षेत्राशी जवळीक साधताना दिसली त्यावेळी ती राजकीय क्षेत्रात प्रवेश करणार का? अशा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. (Kokanhearted Girl On Malaika Arora)
अंकिता एक उत्तम रिल स्टार आहेच पण ती एक उत्तम निवेदक ही आहे. निवेदकाची भूमिका ती अत्यंत चोखपणे पार पडते. सहसा झी मराठी वाहिनीच्या खास सोहळयाला अंकिताला निवेदक म्हणून आमंत्रित केलं जातं. नुकताच झी मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला, यावेळी निवेदिका म्हणून अंकिताने चोख भूमिका निभावत कलाकारांना बोलतं केलं. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून सध्या व्हायरल होत आहेत.
यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळयाला ‘आपल्या घरचं कार्य आहे’ ही थीम आयोजित करण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्याची आकर्षणाची बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराची हजेरी. यंदा झी मराठी पुरस्कार सोहळयाला मलायका अरोरा हिला आमंत्रित करण्यात आलं होतं. मलायका बरोबरचा एक व्हिडीओ अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. आणि या व्हिडिओला जळा मेल्यांनू असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाला मराठीत उत्तर देण्यास अंकिताने बोलतं केलेलं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
या व्हिडिओमध्ये दोघींचं संभाषण पाहायला मिळतंय, यांत अंकिता सुरुवातीला म्हणतेय की, मलायका मॅडम आज आपल्या घरच्या कार्याला आल्या आहेत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या घरी कार्य असत तेव्हा त्यांचा रोल काय असतो. असं बोलून अंकिता मलायकाला प्रश्न विचारते की, तुमच्या घरात जेव्हा कार्य असत तेव्हा तुम्ही घरी काय काय काम करता?. यावर उत्तर देत मलायका म्हणते की, “घरी मी काय काम करते तर मला घरी सर्व स्वच्छ लागतं, घरच्या स्वच्छतेची जबाबदारी ही पूर्णतः माझी असते.” अंकिता पुन्हा पुढचा प्रश्न विचारते की, “तुमचा मराठी असा कोणता पदार्थ आहे जो तुम्हाला खायला आवडतो?”, यावर उत्तर देत मलायका म्हणते, “मला सगळ्या मिठाई आवडतात आणि पुरणपोळी, चकली, शंकरपोळी हे खायला मला विशेष आवडतं.” त्यानंतर ट्रोलर्सला उत्तर देत दोघींनी ‘जळतात मेले’, असं बोलून ट्रोलर्सची बोलतीच बंद केलेली पाहायला मिळतेय.