सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. आपल्या आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियाद्वारे भावुक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन दिली होती. (Mrunal Kulkarni’s reaction to mother’s death)
मृणाल यांनी सोशल मीडियावर “आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी-अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो. आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रुपाने तिची सोबत कायम असेल”. अशी भावुक पोस्ट शेअर केली होती.
अशातच आता मृणाल यांनी पहिल्यांदाच आपल्या आईच्या निधनानंतर आठवणीत भावुक प्रतिक्रिया दिली आहे. मृणाल कुलकर्णी या लवकरच त्यांच्या आगामी ‘गुलाबी’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी मृणाल यांनी आपल्या आईविषयी पुन्हा एकदा सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा – नितीन कुमारच्या मृत्यूचं खरं सत्य समोर, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल, गळफास लावून घेतला अन्…
यावेळी आईबद्दल बोलताना मृणाल यांनी असं म्हटलं की, “अगदी मनापासून बोलायचे झाले तर आज मी इथे यायचं धाडस केलं आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, माझ्या घरी एक दुर्दैवी घटना घडली. पण माझी खात्री आहे की, माझ्या आईची अशीच इच्छा असणार की, थांबायचं नाही. आपल्या जबाबदाऱ्या आणि आपले कर्तव्य मन:पूर्वक पार पाडायचे”.
दरम्यान, ‘गुलाबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला मृणाल कुलकर्णी यांच्यासह अभिनेत्री श्रुती मराठे व चित्रपटातीळ इतर कलाकारही उपस्थित होते. गुलाबी थीम असणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटाची संपूर्ण टीम सहभागी झाली होती. यावेळी ‘गुलाबी’च्या मॅशअपवर लहानग्यांनी सुंदर सादरीकरणही केले. गुलाबी नगरी, जयपूरच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या तीन स्त्रियांच्या मैत्रीचा हा प्रवास प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा ठरणार आहे.