ट्रोलिंगच्या कचाट्यात कलाकार मंडळी हमखास सापडतात. आणि नेटकरीही कलाकारांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बरेचदा ही कलाकार मंडळी मुलाखतींमध्ये ट्रोलिंगबद्दल भाष्य करताना दिसतात. मराठमोळी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिच्या ‘गप्पा मस्ती’ या पॉडकास्टमध्ये अनेक कलाकार येतात आणि वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करतात. (Bhargavi Chirmuley Troll)
मात्र या पॉडकास्टद्वारे अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने स्वतः भाष्य करत तिला आलेल्या ट्रोलिंगचा अनुभव सांगितला आहे. नुकतीच भार्गवीच्या पॉडकास्टला पूजा सावंत हिने हजेरी लावली होती. त्यावेळी ट्रोलिंगबद्दल भाष्य करताना भार्गवीने स्वतःला आलेल्या एका अनुभवाबद्दलही भाष्य केलं.
पाहा भार्गवी का झाली होती ट्रोल (Bhargavi Chirmuley Troll)
भार्गवी म्हणाली की, “आम्ही लहान असताना शाळेत फॅन्टमची गोड सिगारेट मिळायची. आणि त्या फॅन्टमच्या गोड सिगारेटची मज्जा अशी होती की, ती सिगारेटसारखी दिसायची आणि त्याला पुढे लाल रंग असायचा. त्यात लहानपणी आई लिपस्टिक लावू द्यायची नाही, मग आम्ही फॅन्टमच्या मागे जे लाल रंगाचं असायचं, त्यानं ओठ लाल करायचो. मी आणि चैत्रू (चैत्राली गुप्ते) असं अनेकदा करायचो. तर ते फॅन्टम आम्हाला खूप वर्षांनी अॅमेझॉन की पानटपरीवर मिळालं होतं”.
“त्यामुळे आम्ही दोघींनी ती सिगारेट तोंडात घेऊन फोटो काढला होता आणि तो सोशल मीडियावर टाकला होता. त्या फोटोच्या खाली लिहिलं होतं, ‘फॅन्टम गोड सिगारेट, जुन्या आठवणी.’ पण त्यावरून आम्हाला लोकांनी खूप ट्रोल केलं. त्या फोटोवरच्या कमेंट पाहून आम्हाला असं झालं की, ती पोस्ट डिलीट करु या. ‘मरा सिगारेट पिऊन,’ असा अनेक कमेंट या दरम्यान आल्या होत्या”.
पुढे भार्गवी म्हणाली, “आमचं असं झालं, अरे मरा वगैरे काय? आम्ही फोटोखाली लिहिलं आहे, फॅन्टम गोड सिगारेट आहे. पण लोकांनी ती वाचलीच नाही. त्यावरून आम्हाला खूप घाणेरड ट्रोल केलं होतं.”