मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक हिने आपल्या कारकिर्दीत अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. चित्रपट, नाटक, मालिका, रिऍलिटी शो या सर्वच माध्यमांतून अतिशाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजनसृष्टीत तिने तिच्या अभिनय कौशल्याची वेगळीच छाप पाडली आहे. ‘आभाळमाया’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत ती झळकली असून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत तिने साकारलेली इंदुमतीची भूमिका प्रचंड गाजली होती. काही दिवसांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असून प्रेक्षक मालिकेला व मालिकेतील इतर पात्रांना प्रचंड मिस करत आहे. (Atisha Naik in Majjacha Adda)
अतिशा नाईक हिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत अभिमन्यूच्या आईची म्हणजेच इंदुमतीची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. पण या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असताना तिने अचानक ही मालिका अर्धवट सोडली होती. ‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात अतिशाने नुकतीच हजेरी लावली. त्यावेळी तिने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका अर्धवट सोडण्यामागचा खुलासा केला आहे. (Atisha Naik on Sundara Manamadhye Bharli)
‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील इंदुमतीची भूमिका गाजत असताना अचानक ही मालिका का सोडली? असा प्रश्न अतिशाला विचारला. त्याचं उत्तर देताना ती म्हणाली, “मी आईसाठी ही मालिका सोडली होती. माझी आई ८६ वर्षाची होती, जी आता या जगात नाही. त्यावेळेस आई खूप आजारी असायची. एकतर म्हातारपण, त्यात दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची स्थिती येते. तेव्हा मला वाटलं की, मी तिथे असायला पाहिजे. जरी तुम्ही आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहणारे नसलात, तरी बऱ्याच गोष्टीसुद्धा ते आमच्यावर अवलंबून असतात. हाकेला कोणतरी काय हवंय गं, असं म्हटलं तरी आपल्याला बरं वाटतं. प्रत्येकाला वाटतं की, आपण आपल्या हाताने घेऊन करू शकत असलो, तरीसुद्धा आयतं मिळत असल्याची चव नेहमीच छान वाटते.”
हे देखील वाचा – कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर मनसेमध्ये प्रवेश करणार?, म्हणाली, “राज ठाकरेंच्या घरी गेले तेव्हा…”
पुढे ती म्हणाली, “लॉकडाऊन काळात मालिकेचं शूट सुरु होते. त्यानिमित्ताने जवळपास सव्वा ते दीड वर्ष मी नाशिकमध्ये राहिले होते. ज्यावेळेला मी मुंबईला जायचे तेव्हा मी नेहमी आईला भेटायला यायचे. पण नंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा मी महिन्याभराने घरी यायचे, तेव्हा एक महिन्याची आई एक वर्षाची म्हातारी झाल्यासारखे वाटायचे. जशी मुलं पटकन मोठी होतात तशी. त्यामुळे आता जर मी इथे नसेन तर नंतर आपण इथे असायला पाहिजे होतं, याचा मला नेहमी पश्चाताप झाला असता. आई म्हणून ती माझी गरज आहे, मी मुलगी म्हणून तुझी गरज नाही हे तिला दाखवून द्यावं लागायचं. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवू न देता तिच्या आजूबाजूला कसं राहता येईल, यासाठी मी ही मालिका सोडली होती.”
हे देखील वाचा – अवघ्या ७५० रुपयांमध्ये नाना पाटेकरांनी उरकलं होतं स्वतःचं लग्न, फार काळ संसार न करता पत्नीपासून वेगळे झाले कारण…
“पुढे दुसरी मालिका मिळते, पण आईच्या शेवटच्या काळात मी होते, हे माझ्यासाठी महत्वाचे होते.”, असं सांगताना अतिशा नाईक भावुक झाली.