‘बिग बॉस १७’ हा रिऑलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्यात बरीच ताणाताण पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या भागात विकी-अंकितामध्ये पुन्हा वाद झाले आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील अंकिताबाबत एक नवीन मोठी बातमी समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताकडून झालेली एक चूक तिला बरीच महागात पडणार आहे. (ankita lokhande likely evicted from bigg boss 17 house)
‘टेली चक्कर’च्या रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस १७’च्या अलीकडच्या भागात अंकिताची प्रकृती ठीक नसलेली पाहायला मिळाली होती. तिच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्यामुळे तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बिग बॉसच्या घरात बोलावण्यात आलं होतं. पण यादरम्यान अंकिताने केलेली एक वर्तवणूक ही तिला ‘बिग बॉस १७’च्या घरातून बाहेर काढण्याचं कारण ठरु शकते. अंकिताने तिच्या चेकअपसाठी आलेल्या डॉक्टरांना ‘बिग बॉस’च्या घराबाहेरील अपडेट विचारले. या गोष्टीची माहिती ‘बिग बॉस’ने घराच्या नवीन कॅप्टन मुनव्वर फारुकीला दिली. अंकिताचं डॉक्टरांशी झालेलं संभाषक ‘बिग बॉस’ मुनव्वरला हेडफोनमध्ये ऐकवतो.
नवीन आलेल्या प्रोमोत ही बातमी ‘बिग बॉस’ कॅप्टन मुनव्वरला दिल्यानंतर तो घरातल्या सगळ्यांना एकत्र बोलावून घेतो. त्यानंतर तो अंकिताच्या या वर्तवणूकीचा खुलासा करतो. पण या गोष्टीबाबत ती असं काही बोललीच नसल्याचं सांगत अंकिता नकार देते. यासगळ्या संभाषणात अंकिता पुन्हा दुःखी झालेली दिसते आणि पुन्हा रडताना दिसते. अंकिताचं वागणं ‘बिग बॉस’च्या घरातील नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे घरातील नियमांच्या उल्लंघनामुळे ‘बिग बॉस’चे इतर स्पर्धक तिला घरातून बाहेर काढतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे. आता अंकिताच्या या वर्तुवणूकीवर ‘बिग बॉस’ काय निर्णय घेईल याचा उलघडा येत्या भागांमध्ये होणार आहे.
‘बिग बॉस १७’मध्ये आल्यापासून अंकिता लोखंडे व विकी जैन हे कपल बरंच चर्चेत आहे. घरात आल्यापासून या कपलमध्ये बरेच वाद पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इतर गोष्टींबरोबर या कपलमुळे ‘बिग बॉस’च्या घरातील वातावरण नेहमीच तापलेलं पाहायला मिळतं.