दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सूपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचा काही वेगळंच क्रेझ पाहायला मिळतो. अभिनेते रजनीकांत यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात स्वतःची वेगळी अशी जागा निर्माण केली. त्यांचं वय ८०च्या पार असलं तरीही ते अॅक्शन सीन तितक्याच दमदार पद्धतीने करताना दिसतात. आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपटाचा फस्ट लूक आणि टीझर प्रदर्शित केला आहे. रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या चित्रपटातील लूकची बरीच चर्चा होताना दिसते. (rajnikanth new movie lal salaam teaser released)
‘लाल सलाम’ चित्रपटाच्या टीझरमध्ये रजनीकांत मोइनुद्दीन भाई या पात्रात दिसत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांचा कधीही न पाहिलेला असा हटके अंदाज पाहायला मिळतो. टीझरच्या सुरुवातीला रजनीकांत तपकिरी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाच्या पायजम्यात त्यांच्या बंगल्यातून बाहेर येताना दिसतात. त्यानंतर कारखान्याकडे एक गाडी जाताना दिसते. तिथे निळ्या रंगाच्या कपड्यात बरेच लोकं उभे दिसतात. त्याच दरम्यान त्या शॉटमध्ये बरेच अॅक्शन सीन पाहायला मिळतात. तर रजनीकांत त्यांच्या हातात एक मोठी साखळी फिरवताना दिसत आहेत.
या टीझरमध्ये रजनीकांत यांचा भन्नाट अॅक्शन अंदाज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर नंतर दुसऱ्या बाजूला इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण दिसत आहे. तर प्रकाशात एका व्यक्तीची सावली नमाज पठण करताना दिसत आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी शेअर केलेल्या या टीझरमध्ये चांगलीच अॅक्शन पाहायला मिळत आहे. एआर रेहमानच्या ‘जलाली जलाल बजता है’ हे गाणं टीझरच्या पार्श्वभूमीला वाजत आहे. या गाण्यामुळे अॅक्शन सीन आणखीनच प्रभावी वाटत आहे.
रजनीकांत यांच्या नवीन चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा चित्रपटातील हा अंदाज रजनीकांत यांच्या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढवताना दिसत आहे. जरी या टीझरमध्ये रजनीकांत यांची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २०२४मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे.