नुकत्याच झालेल्या गोळीबारांच्या घटनेमध्ये कल्याणनंतर आता दहीसरमधील गोळीबार घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि गोळ्या झाडणारा आरोपी मॉरिसभाई दोघांचाही मृत्यू झाला आहे.
आरोपी मॉरिस भाईने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटद्वारे लाईव्ह येत त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. त्यानंतर अभिषेक घोसाळकर आपली भूमिका मांडतात आणि मग घोसाळकर यांचं बोलणं संपल्यानंतर ते जागेवरुन उठताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात येतो. अभिषेक यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर मॉरिस भाईने स्वत:वरही काही गोळ्या झाडल्या.

या प्रकरणावर राजकीय, सामाजिक तसेच अनेक स्तरारून प्रतिक्रिया उमटत असतानाच कला क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनघा अतुलने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनघाने तिच्या सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल दु:ख, संताप व शोक व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – “ब्रेकअपबद्दल बोलणं…”, एक्स गर्लफ्रेंडने बदनामी केल्यानंतर भडकला अरबाज खान, म्हणाला, “२ वर्षांपूर्वीच…”
अनघाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिषेक घोसाळकर यांच्या गोळीबाराच्या घटनेचे वृत्त शेअर करत “आपल्या आजूबाजूला हे काय घडत आहे. अशा बातम्या पाहून मी अस्वस्थ होते” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याचबरोबर “अशा घटनांकडे आपण अजून किती दुर्लक्ष करणार?” असा प्रश्नही तिने या माध्यमातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सतत अशा गोळीबाराच्या घटना घडत असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. .