महायुती सरकारने राज्यामध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये दरमहा १५०० रूपये महिलांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेची राज्यभर सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या योजनेची जोरदार मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून या योजनेचा दणक्यात प्रचार व प्रसार सुरू आहे. त्यामुळे ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची जाहिरात आता कलाकार मंडळीही करताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरने या योजनेची जाहिरात केली असून या योजनेच्या जाहिरातीचा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (Amruta Khanvilkar Troll)
या व्हिडीओमध्ये अमृताची मैत्रीण अमृतासाठी कैरीचं लोणचं घेऊन येते. अमृताला कैरीचं लोणचं खूप आवडत असल्याने तिलाही आनंद होतो. तेव्हा ती मैत्रीण अमृताला सांगते की, हे लोणचं तिच्या मैत्रिणीने बनवलं असून ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे मिळाल्यानंतर तिने हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यावर अमृता अशी प्रतिक्रिया देते की, “माझ्या आवडत्या लोणच्यामागे अशी प्रेरणादायी गोष्ट असेल, हे मला माहीतच नव्हतं. खरंच, हे सरकार म्हणजे ना लोकांचं आयुष्य बदलून टाकत आहे बघ…”
अमृताने हा जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “महिलाओं का है एक ही नारा, महायुती सरकार में योग्य सन्मान हमारा”. तसंच या व्हिडीओच्या शेवटी तिने ‘लाडकी बहीण योजने’मध्ये नाव नोंदवण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान, अमृताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली अमृताने ही जाहिरात केल्याचे पसंत पडले नसल्याचे नेटकऱ्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा – ऐश्वर्या नारकर यांना मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, खास फोटो केला शेअर, म्हणाल्या, “कृतज्ञ…”
या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”. तर आणखी एकाने “विश्वास बसत नाही तुमच्यासारखी अभिनेत्री यात पडत आहे! हे फुकटचे पैसे आपले आहेत, त्यांच्या खिशातले नाहीत आणि याचा तू प्रचार करत आहेस हे चूक आहे”. अशी कमेंट केली आहे. तसंच एकाने “चंद्रमुखी’नंतरचा तुझा हा दमदार परफॉर्मन्स आहे” अशी मिश्किल कमेंटही केली आहे.
यापुढे एकाने “मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, तुम्ही जबाबदारीने वागू शकता आणि तुमच्या प्रभावाच्या क्षमतेचा गैरवापर करु नका” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “निदान कमेंट बघून तरी पुन्हा अशा जाहिराती करणार नाहीस अशी अपेक्षा आहे. काम चांगलं करतेस, तर स्त्रियांना प्रोत्साहन दे की, तुझ्यासारखं संघर्ष करुन पुढे आलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे. कसं कमावलं पाहिजे”.