Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. गेले काही दिवस हे दोघे चांगलेच चर्चेत आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून ते घराघरांत पोहचले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच दोघांनी गुपचूप साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाची धामधूम सुरू होती. अशातच आता अमृता-प्रसाद एकमेकांबरोबर विवाहबंधनात अडकले आहेत. नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या लग्नसोहळ्याला मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली. (Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage Video Viral On Social Media)
अमृता-प्रसाद यांनी लग्नात मराठमोळ्या पद्धतीचा पेहराव केला. सप्तपदीवेळी अमृताने डिझाईन असलेली गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून त्यावर साजेशा ब्लाऊजदेखील आहे. त्याचबरोबर प्रसादनेदेखील अमृताच्या साडीला मॅचिंग असा पेहराव केला आहे. प्रसादने मराठमोळ्या पद्धतीचा पांढऱ्या रंगाचा धोतर व त्यावर पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
अमृता-प्रसादच्या विवाहसोहळ्याचे व्हिडीओ पाहून चाहतेही भारावले आहेत. नुकतंच त्यांचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला आहे. लग्न होताच या नवविवाहित दाम्पत्यांनी गाण्यावर ताल धरला. यावेळी अमृताने लाल रंगाचा डिझाईनर लेहेंगा परिधान केला होता. तर प्रसादने पांढऱ्या रंगांची शेरवानी व त्यावर पांढऱ्या रंगाचा फेटा परिधान केला आहे. प्रसादने-अमृताने प्रेमाने एकमेकांचा हात धरत डान्स केला. यावेळी त्यांच्याबरोबर मित्रमंडळी, नातेवाईक व उपस्थितांनीसुद्धा ठेका धरला. त्याचबरोबर या व्हिडीओत ते अगदी आनंदात नाचताना दिसत आहेत.
दरम्यान अमृता-प्रसादने यांनी सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदी, हळदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमाल-मस्तीचे अनेक व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाचे हे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून या फोटो-व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते अमृता-प्रसादला त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छाही देत आहेत.