‘१२वी फेल’ चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता अभिनेता विक्रांत मॅसी ‘ब्लॅकआउट’ या नव्या चित्रपटात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, यातील विक्रांतची भूमिका अधिक लक्षवेधी ठरत आहे. विक्रांतच्या व्यक्तिरेखेतून अनेक उलगडणारे पदर आहेत. जे उघडपणे समोर आल्यावर साऱ्यांना आश्चर्य वाटेल. या चित्रपटात मौनी रॉय, सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. ‘ब्लॅकआऊट’ची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती आणि आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चित्रपटाची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. (Blackout Movie Trailer)
‘ब्लॅकआउट’च्या ट्रेलरबरोबरच चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ७ जून रोजी OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर हा चित्रपट पाहता येणार आहे. ‘ब्लॅकआऊट’चा ट्रेलर एका काळोख्या रात्रीच्या कथेपासून सुरु होतो, जेव्हा संपूर्ण शहरातील दिवे बंद असतात आणि रस्त्यावर मुसळधार पाऊस असतो तेव्हा कथेत येणारे रंजक ट्विस्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘ब्लॅकआऊट’च्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत असून चाहते कौतुक करत आहेत. ‘ब्लॅकआउट’मध्ये कॉमेडी आणि सस्पेन्सबरोबर हॉररचा टच आहे.
विक्रांत मेसीच्या या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. हा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. आजवर प्रसादने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही प्रसाद बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. प्रसादने आजवर अभिनयासह अनेक चित्रपटांच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह प्रसादने आजवर बॉलिवूडमध्येही महत्त्वपूर्ण काम केले आहे. आता पुन्हा एकदा प्रसाद या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे.
प्रसादने या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरुन शेअर केले आहे. पोस्टरवर प्रसाद पोलीस अधिकाराच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रसादसह या चित्रपटात अभिनेत्री छाया कदमही दिसणार आहे. या चित्रपटाचं ऑफिशिअल पोस्टर छाया कदम यांनाही टॅग करण्यात आलं आहे.