गेली अनेक वर्षे नाटक, चित्रपट व मालिका यांतून प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत आलेले अभिनेते शरद पोंक्षे यांचं रंगभूमीवर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक चांगलंच गाजलं आहे. जितकं हे नाटक गाजलं होतं, तितकाच यावरून वाददेखील सुरु होता. मात्र तरीही तब्बल २० वर्ष हे नाटक रंगभूमीवर सुरु होतं. ११ मार्च २०१८ रोजी ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हे नाटक रंगभूमीवर परतणार असून तशी घोषणा अभिनेते शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर केली आहे. (Mi Nathuram Godse Boltoy Natak)
येत्या ऑक्टोबरमध्ये ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगताना शरद पोंक्षे यांनी या नाटकाचे केवळ ५० प्रयोग होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत या नाटकाबद्दलची माहिती दिली आहे.
अभिनेते शरद पोंक्षे व्हिडिओमध्ये म्हणाले, “नमस्कार आज १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा! आज एक अतिशय आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे. मी ११ मार्च २०१८ ला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा शेवटचा प्रयोग केला. त्यानंतर जाहीर केलं की, यापुढे मी रंगभूमीवर नथुरामच्या भूमिकेमध्ये कधीही दिसणार नाही. त्या शब्दाशी मी प्रामाणिक राहिलो. आणि गेली पाच-साडेपाच वर्षे हे नाटक केलं नाही. पण गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये मी व्याख्यानाच्या किंवा विविध कामाच्या निमित्ताने महाराष्ट्राभर फिरत असताना सतत लोक माझ्या पाठीमागे लागले, की थोडेतरी प्रयोग करा. आमच्या पुढच्या पिढ्यांना तो बघायचं आहे.”
हे देखील वाचा – अभिनेते भरत जाधव ‘हे’ नवं नाटक घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार कधीही न पाहिलेल्या भूमिकेत
“रसिकांनी इतका रेटा लावला होता. त्यानंतर मी विचार केला की, एकंदरीत माझं वय आणि नथुराम गोडसेचं वय लक्षात घेता जर मी हे नाटक आता केलं नाही तर अजून चार-पाच वर्षांनी मला ते करता येणार नाही. त्यामुळेच फक्त ५० प्रयोगांसाठी ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक करण्याचा निर्णय मी घेतला आहे. ऑक्टोबर २०२३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे प्रयोग करणार आहे. २० वर्ष आणि ११०० प्रयोगांमध्ये जे कलावंत, तंत्रज्ञ होते, तेच यामध्ये असणार आहेत. येत्या ऑक्टोबर मध्ये हे नाटक पुन्हा घेऊन येणार आहेत.”, असे शरद पोंक्षे म्हणाले.
हे देखील वाचा – वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात भरती होती गश्मीरची आई, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आई आता…”
शरद पोंक्षे यांच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावर अनेक राजकीय पक्षांकडून बंदी घालण्याची मागणी येत होती. शिवाय, नाटकादरम्यान अभिनेते शरद पोंक्षे यांना अनेकदा धमकीचे फोनदेखील आले. तरीसुद्धा महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये या नाटकाचे १००० हुन अधिक प्रयोग पार पडले आहे. (Mi Nathuram Godse Boltoy Natak)