मागील काही दिवसांपासून सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. अशातच प्रेक्षकांचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परबही बोहोल्यावर चढणार असल्याचं समोर आलं. तेव्हापासून साऱ्यांच्या नजरा प्रथमेशच्या लग्नसोहळ्याकडे लागून राहिल्या आहेत. प्रथमेशने मागच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला प्रेमाची कबुली दिली होती. अभिनेता क्षितिजा घोसाळकरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. (Prathamesh Parab Engagement)
काही दिवसांपूर्वीच प्रथमेश व क्षितिजा यांच्या केळवणालाही सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. यावरुन ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरबरोबर केळवणाचा फोटो शेअर देखील केले होते. त्यावेळी त्यांनी लग्नाची तयारी सुरु, साखरपुडा असे अनेक हॅशटॅग कॅप्शन म्हणून वापरले होते. शिवाय दोघांनी त्यांच्या नावापासून तयार केलेला #pratija असा सुंदर हॅशटॅग पोस्टमध्ये वापरला. यानंतर आता प्रथमेश व क्षितिजाने आनंदाची बातमी देणारी एक पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर केली आहे.
क्षितिजाने ही पोस्ट शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची तारीख जाहीर केली आहे. दोघांचे एकत्र फोटो शेअर करत तिने पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत याखाली कॅप्शन देत प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने म्हटलं आहे की, “‘व्हॅलेंटाईन डे’चं आमच्या नात्यामध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे प्रत्यक्षरित्या आम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’ वगैरे सारख्या कन्सेप्टवर कधी विश्वास नाही करायचो, नेहमीच्या दिवसासारखाचं तोही एक दिवस, त्यात इतकं काय खास?पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टीच खूप खास बनतात. १४ फेब्रुवारी २०२०ला माझी व्हॅलेंटाईन डे स्पेशल फोटोशूटची सिरीज पाहून प्रथमेशने मला पहिल्यांदा मेसेज केला. १४ फेब्रुवारी २०२१ पासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो. १४ फेब्रुवारी २०२२ खूप आठवणी जमा करत आमच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालं” असं तिने म्हटलं.
यापुढे तिने लिहिलं आहे की, “१४ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही आमच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अधिकृतरीत्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. १४ फेब्रुवारी २०२४ ला आमच्या नात्याला ३ वर्षे पूर्ण होत आहेत मग आता काहीतरी खास केलंच पाहिजे ना, म्हणून १४ फेब्रुवारी २०२४ ला आम्ही साखरपुडा करायचं ठरवलं आहे. तळटीप : लग्नाची तारीख अजूनही गुलदस्त्यातचं आहे बरं का” असं म्हणत साखरपुड्याची तारीख जाहीर केली.