‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असून ही मालिका साऱ्यांच्याच मनावर राज्य करताना दिसतेय. ‘पारू’ या मालिकेत पारूची मुख्य भूमिका अभिनेत्री शरयू सोनावने साकारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर प्रसाद जवादे हा आदित्यच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. प्रसाद आणि पारूच्या जोडीला प्रेक्षक खूप प्रेम देताना दिसतात. मालिकेच्या कथानकाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. (Paaru Serial Fan Moment)
मालिकेत घरकाम करणाऱ्या मुलीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. दरम्यान एका घरकाम करणाऱ्या मुलीला त्या घरात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बरेच चाहते बोलताना दिसतात. घरकाम करणाऱ्या मुलीला देण्यात येणाऱ्या वागणुकीला कोणीतरी न्याय मिळवून देत आहे ही गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला विशेष भावतेय. त्यामुळे प्रेक्षक मंडळी मालिका आवर्जून पाहत आहेत. अशातच प्रसादने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
प्रसाद सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अशातच प्रसादने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वत्र पसरला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसादच्या मालिकेची म्हणजेच ‘पारू’ मालिकेची एक चाहती आपलं मनोगत व्यक्त करताना दिसत आहे आणि ही चाहती एक आजी असून प्रसादने हा व्हिडीओ आजीच्या परवानगीने सोशल मीडियावरुन शेअर केला असल्याचं म्हटलं आहे.
या व्हिडीओमध्ये आजी असं म्हणताना दिसत आहेत की, “गडीमाणूस तुमच्याकडे कामाला येते तेव्हा तिच्याशी तुम्ही तिरस्काराने वागता, अशाप्रकारे वागणूक देता. त्यांच्याबद्दल थोडंतरी तुमच्यातील माणुसकी दाखवली पाहिजे. मालिकेतला एक सीन मला फार आवडला. तिच्या खिशात ती हार लपवते. आणि नंतर तिला चोर ठरवते. त्यावेळी तिची जाऊबाई नंतर परीक्षण करून अगदी खरं सांगते. ती कठोर दाखवत असली तरी खरं ते तिने पाहिलं. हा प्रसंग मला खूप आवडला. मी एकटीच असते. एकटीच स्वयंपाक काय असतो, आणि सतत झोपून तरी किती राहायचं. म्हणून मग हा मालिकांचा नाद लागला आहे. आणि एखादी मालिका पटत नाही ती मी पाहतच नाही. सुरुवातीला एक-दोन भाग आवडले तर पाहते नाहीतर नाही. आणि एखादी मालिका आवडली तर अगदी शेवट्पर्यंत ती मालिका पाहते”.
आजी पुढे असंही म्हणाल्या की, “सुरवातीला १३ प्रयोगांच्या मालिका यायच्या. त्या दिवसांत संपायच्या. आता मालिका बऱ्याच लांबणीवर जातात. मटण वाढवायचं असेल तर त्यात तांब्याभर पाणी टाकलं जायचं आणि मसाला टाकून वाढवलं जायचं, हे खेडेगावात बहुदा करतात, तसंच काहीस मालिकांचं आहे”, प्रसादने त्याची ही फॅन मुमेंट शेअर केली आहे.