मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत कर्करोगाचा सामना केला असल्याचा खुलासा केला होता. अतुल यांना कर्करोग झाला होता, ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. मात्र त्यांनी या गंभीर आजारावर मात करत आणि मनोरंजन क्षेत्रात कमबॅक केलं आहे आणि सर्वांसाठी ही प्रेरणादायी गोष्ट आहे. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या या कमबॅकबद्दल ‘झी नाट्य गौरव २०२४’ या सोहळ्याध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला असून याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अतुल परचुरे यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओमध्ये संजय मोने आपल्या लाडक्या मित्रासाठी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यात त्यांनी असं म्हटलं की, “गेली ४० वर्षे आम्ही दोघे जवळपास रोज भेटतो. जो हजर नाही, त्याच्याबद्दल वाईट बोलून आम्ही गेली ४० वर्षे घालवली आहेत. परचुरे हे वयाने आमच्यापेक्षा लहान असले तरी आम्ही त्यांना ‘साहेब’ म्हणतो आणि इतके दिवस त्यांनी ज्या जिद्दीने आजारावर मात केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना इथून पुढेही कायम ‘साहेब’च म्हणू.” असं म्हणत मोने खूपच भावुक झाले.
यापुढे अतुल परचुरे यांनी असं म्हटलं की, “बरोबर एका वर्षाआधी मी उभा राहू शकेन की नाही याची मला स्वत:ला शाश्वती नव्हती. त्यामुळे मराठी रंगभूमी, प्रेक्षक, मित्रपरिवार व माझे कुटुंबीय या सर्वांमुळे मी आज नाटक इथे नाटक सादर करू शकलो. मला कुणी भेटलं किंवा नाही भेटलं हाअ मुद्दा नाही. पण सर्वांनीच माझ्यासाठी प्रार्थना केली. सगळ्यांनाचं मी बरं व्हावं असं वाटत होतं याची मला १००% खात्री होती. याकाळात माझी बायको, मुलगी व आई या तिघींनी व माझ्या अनेक मित्रांनी भोगलं आहे. आता त्यांचे आभार मानणं चुकीचे ठरेल. पण मी आज जो कुणी आहे तो त्यांच्यामुळेच आहे.”
दरम्यान, झी नाट्य गौरव २०२४’मध्ये अतुल यांनी आनंद इंगळे, सुनील बर्वे, महेश मांजरेकर या कलाकारांसह ‘नटसम्राट’चे सादरीकरण केले. त्यांच्याशिवाय संजय मोने, पुष्कर श्रोत्री, मोहन जोशी, भाऊ कदम, वैभव मांगले, चंद्रकांत कुलकर्णी हे कलाकारही मंचावर उपस्थित होते. यावेळी नाट्यगौरवच्या मंचावर याच कलाकारांच्या हस्ते अतुल परचुरे यांचा सन्मान करण्यात आला.