एक उत्तम अभिनेता, एक उत्तम कवी, एक उत्तम निवेदक,एक उत्तम दिग्दर्शक व एक उत्तम माणूस म्हणून मराठी कलाविश्वातील लोकप्रिय असलेला कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणच्या अभिनयासह, त्याच्या लिखाणाचे, दिग्दर्शनाचे आणि त्याच्या कवितांचे अनेक चाहते आहेत. संकर्षण त्याच्या अभिनय, लिखाण व सादरीकरणामुळे जितका ओळखला जातो. तितकाच तो त्याच्या कवितांसाठीही ओळखला जातो. अभिनेत्री स्पृहा जोशीबरोबर तो कवितांचे कार्यक्रम करत असतो. त्यांचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. याच कार्यक्रमानिमित्त संकर्षण परदेशात गेला असून परदेशात त्याला त्याच्या शाळेतील शिक्षिका भेटल्या. याचनिमित्ताने संकर्षणने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे आणि हा खास फोटो शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो… माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि “कऱ्हाडे धडा वाच, कऱ्हाडे, अक्षर अतिशय घाण आहे. तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार? असं म्हणायच्या”. पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमीच आलेला असायचा) की, “कऱ्हाडे गाणं म्हण” असं म्हणायच्या. आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “यामुळे मला खूप भरुन आलं. प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत ऊभा असतो पण, बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली. माझी आज शब्दांशी ‘जर मैत्री असेल’ तर ती बाईंनीच करून दिली आहे. हे नातं तेव्हाचं आहे, जेंव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो. समजा शाळेतले गुरूजी भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो“.
आणखी वाचा – आधुनिकतेला पारंपरिकतेचा साज, अगदी प्रशस्त आणि भव्य आहे ‘बिग बॉस मराठी’चं नवीन घर, पाहा संपूर्ण Video
यापुढे त्याने भावना व्यक्त करत असं म्हटलं आहे की, “अभ्यासात मी कधीच हूशार नव्हतो. त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई-बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही. पण आज सांगतो आई-बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही की “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”. दरम्यान, संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून अनेकांनी या पोस्टखाली कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केलं आहे. “खूप खूप अभिनंदन, किती गोड योगायोग, संकर्षण, हे खरं बक्षीस आहे, तुम्ही अप्रतीम काम करत आहात, हीच ती गुरु शिष्य भेट” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी संकर्षणचे कौतुक केलं आहे.