छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा बॉस असलेला ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व म्हणजेच ‘बिग बॉस मराठी ५’ आजपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस’ प्रेमींना या पर्वाची आतुरता लागली आहे. आज म्हणजेच २८ जुलैपासून ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. यंदा ‘बिग बॉस’ मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात कोण-कोण स्पर्धक येणार आहेत?, ‘बिग बॉस’ची यंदाची थीम काय असणार आहे?, बिग बॉसच्या नवीन पर्वात प्रेक्षकांना इतर पर्वांपेक्षा नवीन काय पाहायला मिळणार आहे. यासारख्या अनेक प्रश्नांची उत्सुकता लागून राहिलेली असते. याचबरोबर चाहत्यांना आणखी एकाची उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे, ‘बिग बॉस’च्या घराची. प्रत्येक पर्वात ‘बिग बॉस’चे घर हे नवीन असते. त्यामुळे यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’चे घर कसं असणार?, यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’च्या घरात प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? चला जाणून घेऊया.
यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घराची थीम ही चक्रव्यूहशी संबंधित असलेली पाहायला मिळत आहे. प्रशस्त गार्डन, मोठे स्वयंपाकघर, प्रत्येकाला स्वततंत्र बेड असलेली बेडरूम आणि मोठा लिव्हिंग एरिया असलेलं ‘बिग बॉस’चे हे नवीन घर आहे. बाहेरच्या लिव्हिंग एरियामध्ये डोळ्यांच्या अनेक प्रतिकृती आहेत. ज्याची सर्व स्पर्धकांवर नजर असणार आहे, जंगल आणि पाणी यांचा समतोल साधत या घराचे इंटीरिअर करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी लाकडांचे व हिरव्या गवताने सजावट केली असल्याचे दिसून येत आहे.
‘बिग बॉस मराठी’चच्या घरात स्वयंपाकघराचेही अत्यंत महत्त्व आहे. या ठिकाणी घरातील सर्व सदस्यांचे जेवण बनवले जाते. त्यामुळे मोठे व प्रशस्त असं स्वयंपाकघर आहे. या स्वयंपाकघराला मॉडर्नसह पारंपरिकताही जपण्यात आली आहे. आजच्या काळातील अनेक भांड्यांसह पारंपरिक मातीची भांडीही या घरात पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक आरसे असलेलं प्रशस्त असं वॉशरूमही या घरात पाहायला मिळत आहे. मोठा आरसा, काचेपासून बनवलेलं मोठं झुंबर हे या वॉशरूममधील आकर्षण ठरत आहे.
त्याचबरोबर उत्तम आसनव्यवस्था असलेली लिव्हिंग रूमही या घराची शोभा वाढवत आहे. बसायला मोठे सोफे, टेबल व आकर्षक वस्तूंनी या घराची सजावट केलेली आहे. त्याचबरोबर या घरात जे बेडरूम्स आहेत. त्यांची वेगळी थीम आहे. या घरात पाण्यांखालील जग ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे या घरातील बेडरूम्स सजवण्यात आलेले आहेत. एकूणच उत्तम सजावट, प्रशस्त जागा असलेले ही ‘बिग बॉस’चं नवीन घर खूपच छान आहे.
आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे रविवारचा दिवस यशस्वी जाणार, मेष, वृषभ राशीच्या संपत्तीत होणार वाढ, जाणून घ्या…
दरम्यान, आजपासून ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व बघायला मिळणार आहे. रोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. रितेश देशमुखला ‘बिग बॉस’ मराठी ५ मध्ये आपली छाप सोडता येणार का? तो या शोमध्ये काय नावीन्य आणणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस या शोचे व रितेश देशमुखचे अनेक चाहतेही चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की…