Dadasaheb Phalke Award Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी असंही लिहिले आहे की, ज्येष्ठ अभिनेते मिथुन दा यांना त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटसृष्टीतील प्रवास व भारतीय चित्रपटसृष्टीतील अप्रतिम योगदानाबद्दल या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
ट्विट करत त्यांनी लिहिलं आहे की, “मिथुन दा यांचा शानदार चित्रपट प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो. मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की, दादासाहेब फाळके निवड ज्युरीने महान अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे”. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी हिंदी, बंगाली, ओरिया, भोजपुरी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांसह विविध भाषांमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आणखी वाचा – दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?

मात्र, मिथुन यांचे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात फारसे यश संपादन करु शकले नाहीत. असे म्हटले जाते की, कठोर परिश्रम करुनही, त्यांच्या कारकिर्दीचा वेग पाहून ते दुःखी झाले.त्यांचा हा दुःखी चेहरा पाहून दिग्दर्शक बब्बर सुभाषने त्यांना विचारले, “काय झाले?”. यावर अभिनेत्याने त्यांना सांगितले की, तो त्याच्या कामात खूप मेहनत करतोय पण ज्या पदासाठी तो एवढी मेहनत करत आहे ते पद मिळवू शकत नाही. यानंतर बी. सुभाषने मिथुन यांना ‘डिस्को डान्सर’ ऑफर केली आणि इथूनच त्याचे नशीब असे बदलले की त्याने मागे वळून पाहिलेच नाही.
१९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता, ही त्या काळातील चित्रपटांसाठी मोठी गोष्ट होती. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृग्या’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मिथुन यांनी आत्तापर्यंत ‘डिस्को डान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पांच’, ‘सहस’, ‘वरदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहाना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’,’ मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’ सारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटात काम केले आहे.