Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. यंदाचं हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं असणार आहे. त्यामुळे आता शेवटचा आठवडा ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळत आहे. स्पर्धकांची ट्रॉफीपर्यंतची लढाई जोरदार सुरु झाली आहे. यंदाच्या या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी रितेश देशमुख याने उत्तमरीत्या सांभाळली. भाऊच्या धक्क्यावर रितेशने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. आता गेल्या दोन आठवड्यांपासून शोमध्ये भाऊचा धक्का पार पडलेला नाही. त्यामुळे सगळेच जण भाऊच्या धक्क्यावर रितेशला मिस करत आहेत. अशातच रितेश भाऊच्या धक्क्यावर नसण्याने अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेलं पहायला मिळत आहेत.
अनेकांच्या मते ‘बिग बॉस’मधील होस्टींगवर झालेल्या ट्रोलिंगला घाबरुन रितेशने हा शो सोडला असल्याचं म्हटलं. तर काहींनी तो पुन्हा येणार नसल्याचंही सांगितलं. अशातच आता रितेशच्या बायकोने शेअर केलेल्या व्हिडीओने या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अभिनेत्याची पत्नी जिनिलीया देशमुखने रितेश व मुलांचा परदेशातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंगनिमित्त सध्या रितेश परदेशात असल्याने त्याला सगल दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहता आलेलं नाही हे स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा – फिनाले वीकपर्यंत पोहोचले ‘बिग बॉस”च्या घरातील सात स्पर्धक, ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?, उत्सुकता वाढली

अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रितेश आपल्या मुलांबरोबर परदेशात फेरफटका मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जिनिलियाने असं म्हटलं आहे की, “लाडक्या बाबाला २० दिवसांनी भेटल्यावर हे दोघंही आईला विसरून जातात. एवढ्या दिवसांनी बाबा भेटल्यावर आई फक्त फोटो आणि व्हिडीओ काढायला यांच्याबरोबर असते.” या व्हिडीओमुळे रितेश परदेशात असल्याने भाऊच्या धक्क्यावर गैरहजर राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान, रितेश देशमुख येत्या ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या महाअंतिम सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आता ‘बिग बॉस मराठी’चा विजेता म्हणून रितेश कोणाच्या नावाची घोषणा करणार हे ऐकण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.