देश उभारणी वा देशाच्या विकासकामांत सैनिक, डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांचे जितके योगदान असते. तितकेच या देशात काम करणारा मजुर, कामगार, सफाई कर्मचारीदेखील देशाच्या विकासात आपले योगदान देत असतो. मात्र समाजातील या घटकांकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही. क्वचितच कुणा एखाद्याचे लक्ष या घटकांकडे जाते आणि असेच एकाचे लक्ष एका सफाई कर्मचाऱ्याकडे गेले आणि तो एक म्हणजे अभिनेता जितेंद्र जोशी.
आज २६ जानेवारी, स्वतंत्र देशाचा ७५वा प्रजासत्ताक दिन आणि आजच्या या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यभरातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये आज झेंडावंदन केले जाते. यानिमित्त सर्व शाळा परिसर स्वच्छ केला जातो. अशीच एक शाळा स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगाराला जितेंद्र जोशी या अभिनेत्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.
जितेंद्र जोशी हा अभिनेता असण्याबरोबच एक सामाजिक जाण जाणणारा सजग नागरीकदेखील आहे. जितेंद्र हा नेहमीच त्याच्या समाजाविषयीच्या जाणिवा व्यक्त करत असतो. अशातच त्याने २६ जानेवारीनिमित्त साफसफाई कर्मचाऱ्याप्रती त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्रने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.
जितेंद्र जोशीने पुण्याच्या एका शाळेतील सफाई करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटे ती व्यक्ती शाळेच्या आजूबाजूचा परिसर साफ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जितेंद्रने असं म्हटलं आहे की, “सकाळी ५.३० वाजता ही व्यक्ती शाळा तयार करते आहे. विद्येने बुध्दी प्राप्त होते आणि ज्ञान संपादन करता येतं. खरं ज्ञान हे की अशी असंख्य माणसं आपल्या कळत नकळत कार्यरत असतात. आपल्यासाठी काम करत असतात. त्यांची आपण दखल घ्यावी आणि त्यांच्यावर प्रेम करावं. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”. दरम्यान, जितेंद्रने शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स् व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “समाजात यांचे योगदान फारच महत्त्वाचे आहे, त्यांच्याकडे फार कुणाचं लक्ष जात नाही, पण तुम्ही त्यांना तुमच्या कॅमेऱ्यात टिपलंत, यासाठी तुम्हाला धन्यवाद”. अशा आशयाच्या अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत