एखादा कलाकार आपली कला इतरांसमोर सादर करून समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. समोरच्याला आपली कला आवडणे व त्याने त्या कलेला योग्य ती दाद दिल्यामुळे कोणताही कलाकार संतुष्ट होतो. कलाकार हा त्याच्या कलाक्षेत्रात जितका आनंदी असतो, तितकाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एकाकीचे जीवन जगत असतो आणि या एकाकी जीवनात तो त्याच्या कलेव्यतिरिक्त इतर गोष्टी करण्यात रमतो. या इतर गोष्टी म्हणजे वाचन करणे, चित्र काढणे, फिरणे आणि यासारखे बरेच काही.
काही कलाकार त्यांचं मन रिझवण्यासाठी कलेव्यतिरिक्त आध्यात्मिक मार्ग साधतात आणि यांपैकीच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी ही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे जितकी ओळखली जाते तितकीच ती आध्यात्मिकही आहे. प्राजक्ता ही तिच्या कलाक्षेत्राव्यतिरिक्त आध्यात्मिक क्षेत्रातही तितकीच कार्यरत असते. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांच्या प्रवचनात त्यांना “लग्न करणे जरूरी आहे का?” असा प्रश्न विचारला होता आणि तिच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता अभिनेत्रीने त्यांना पुन्हा एकदा एक प्रश्न विचारला आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती श्री श्री रविशंकर यांना असा प्रश्न विचारते की, “कलाकार हा इतरांच्या आयुष्यात आनंद देत असतो, पण तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटाच असतो. हे सगळ्यांच्या आयुष्यात असतं, पण एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात हे एकाकीपण जरा अधिकच असतं. तर कलाकाराने समाजाप्रती, कुटुंबाप्रती आणि स्वत:च्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे?”. यावर उत्तर देत श्री श्री रवीशंकर असे म्हणतात की, “कलाकार हा नेहमीच चेहऱ्यावर खोटा आनंद घेऊन समाजात वावरत असतो. यामुळे कलाकार दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वत: आनंदी राहण्याचे विसरून जातो. कलाकार हा स्वभावाने खूपच भावुक असतो आणि भावना कधीच एकसारखी नसते. एखाद्या कलेत नऊ रस, नऊ भाव असतात. त्यांना आपण कलेद्वारा मांडत असतो पण आपण जोपर्यंत भावातीत होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात स्थिरता येत नाही. त्यामुळे कलाकाराच्या आयुष्यात एकाकीपण असते.”
आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”
यापुढे श्री श्री रविशंकर यांनी योगाचे व अध्यात्मिक ज्ञानाचे एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातील स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगत त्यांनी आध्यात्मिकतेचे महत्त्वदेखील पटवून दिले. दरम्यान, प्राजक्ता माळीला या खास प्रवाचनासाठी कलाकार म्हणून बोलवण्यात आले असल्याचा आनंद तिने यावेळी व्यक्त केला आहे. तसेच या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.