मनोरंजन विश्व हे बाहेरून दिसताना अगदी दिमाखदार अन् लाईमलाइटवालं दिसत असलं तरी या क्षेत्रात ‘दिव्याखाली अंधार’ म्हणतात तसं चित्र आहे. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना अवघ्या एका रात्रीत ध्रुवताऱ्यासारखे अढळ पद मिळाले आहे, तर अनेकांच्या नशिबी एका रात्रीत अमावस्याही आली आहे. मनोरंजन सृष्टीतील यश मिळवणे हे जितके सहजसोपे आहे, तितकेच ते टिकवून ठेवणे अवघड आहे. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात विविध भूमिका केल्या. पण ते अचानक चित्रपटसृष्टीतुन गायब झाले. या यादीत एका अभिनेत्याचं नाव वारंवार घेतलं जाते. हा अभिनेता म्हणजे आमिर खानचा भाचा इम्रान खान.
इम्रान खानने एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिकेत काम केलं, त्याचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पण तो आता अचानक या चित्रपटसृष्टीतून गायब झाला आहे. इम्रान खानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तो अभिनेत्री जिनिलीया देशमुखबरोबर झळकला होता. या दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्याचा पदार्पणातील हा पहिलाच चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर इम्रान खानने दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर अभिनय केला. पण २०१५ साली इम्रानने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. यावर अभिनेत्याने स्वत: भाष्य केलं आहे.
वोग इंडिया’ या मासिकाबरोबर झालेल्या मुलाखतीत इम्रानने अभिनया क्षेत्रापासून दूर जाण्याचं कारण सांगितलं आहे. यावेळी तो असं म्हणाला की, “२०१६ मध्ये माझं करिअर खूपच खालच्या पातळीवर घसरलं होतं, तेव्हा मी आतून खूप तुटलो. मला तेव्हा पैशाची चिंता नव्हती. कारण सुदैवाने मी एका अशा क्षेत्रात काम करत होतो, ज्याने माझ्या पाठीशी आर्थिक पाठबळ मजबूत होतं. त्यामुळे त्या काळात मला पैशासाठी काम करण्याची गरज नव्हती. तसंच याच काळात मला एक मुलगी झाली आणि तेव्हा एक अभिनेता होण्यापेक्षा जास्त मला एक चांगला बाप होण्याची गरज आहे असं वाटलं.”
अभिनेत्याने त्याचा हा एकांतवास अनुभवण्यासाठी त्याची पूर्ण जीवनशैली बदलली आहे. पूर्वी तो पाली हिल परिसरात एका बंगल्यात राहत होता. पण आता तो वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. त्याने आपली महागडी अलिशान कार सोडली असून आता तो एक छोटी कार वापरतो. त्याने आता त्याची स्टाइल बदलली असून तो आता साध्या कपड्यांमध्ये वावरतो. तसेच त्याच्याकडे स्वयंपाकघरात ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि फक्त १ पॅन आहेत.
दरम्यान, इम्रानचं पहिलं लग्न बालमैत्रीण अवंतिका मलिकबरोबर झालं होतं. २०११ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना ‘इमारा’ नावाची मुलगी आहे. पण २०१९ मध्ये दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अवंतिकापासून विभक्त झाल्यानंतर इम्रान पुन्हा प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. सध्या तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.