‘झी मराठी’ वाहिनीवर ४ डिसेंबरला ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअॅलिटी शो सुरू झाला असून या शोचे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. अल्पावधीतच या शोला खुप लोकप्रियता मिळाली आहे. अनेकांनी हा शो त्यांना आवडत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या शोमध्ये अनेक मान्यवर मंडळी सहभागी होत असतात, महेश मांजरेकर, कुशल बद्रिके यांच्यासह अनेकांनी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. अशातच येत्या एपिसोडमध्ये या शोमध्ये अभिनेता सागर कारंडेचीदेखील पाहुणा म्हणून एण्ट्री होणार आहे. (Jau Bai Gavaat New Video)
झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे नुकताच या शोचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात सागर कारंडे हा त्याच्या ‘चला हवा येऊ द्या’ शोमधील गाजलेल्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या येण्याने शोमधील स्पर्धकांसह अनेकांनाच आनंद झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सागरच्या पत्रवाचनाने अनेकांच्या डोळ्यात नकळतपणे अश्रु निखळल्याचे पाहायला मिळाले होते आणि अगदी तसाच काहीसा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.
या व्हिडीओमध्ये सागर या शोमधील स्पर्धकांसाठी त्यांच्या आई-वडिलांचे पत्र वाचून दाखवतात आणि हे ऐकून सगळेच भावुक होतात. यापुढे सागर हार्दिक जोशीसाठी एक खास पत्र वाचून दाखवतो आणि हे खास पत्र असतं त्याच्या वहिनीचं. त्यामुळे अभिनेत्याला रडू अनावर होते. यावेळी सागर त्याच्या वहिनीचे पत्र वाचत असे म्हणतो की, “प्रिय हार्दिक, तुझ्या संघर्षाच्या काळात तुला माझ्याकडून पैसे घ्यायला संकोच वाटायचा. तुम्ही राणादाची वाहिनी ना? हे एकूण मला खूप अभिमान वाटायचा.”
यावर प्रतिक्रिया देत हार्दिक असं म्हणतो की, “हा शो नुकताच प्रदर्शित होणार होता. पण वहिनीला तेव्हा बोलताही येत नव्हतं. तेव्हा हा शो सोडू नकोस असं म्हणत तिने मला शपथ घातली होती.” दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात हार्दिकच्या वहिनीचे निधन झाले होते. तेव्हा हार्दिकने वहिनीच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली होती. जाऊ बाई गावात हा शो हार्दिकने त्याच्या वाहिनीसाठी समर्पित केल्याची भावना त्याने व्यक्त केली होती आणि आता पुन्हा आपल्या वहिनीच्या आठवणीत हार्दिक भावुक झाला असल्याचे पाहायला मिळाले.