Actor Dr. Vilas Ujawane Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे काल शुक्रवारी (४ एप्रिल)ला निधन झाले. प्रदीर्घ आजाराने त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर आपली एक वेगळी छाप सोडली. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले. त्यांच्या भूमिका कायमच लक्षात राहणाऱ्या होत्या. मात्र, सिनेसृष्टीत काम करत असतानाच त्यांना एका आजाराने घेरले. साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक या आजाराने ग्रासलं होतं.
ब्रेन स्ट्रोक या आजाराशी सामना करत असताना त्यांना त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. इतकंच नाहीतर या आजाराशी लढा देतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आणि त्यात कावीळचेही निदान झाले. या उपचारांसाठी त्यांनी त्यांची आयुष्यभराची कमाई वापरली. आजारपणाशी लढा देत असताना ते पुन्हा कर्मभूमीवरही परतले. त्यांच्यातील अभिनयाची आवड त्यांना काही केल्या शांत बसू देत नव्हती. उपचारादरम्यान विलास यांना आर्थिक गरज होती तेव्हा त्यांच्या जवळच्या मित्राने आणि पत्नीने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, गंभीर आजाराशी झुंज अपयशी, कुटुंबियांना मोठा धक्का

विलास यांचे जवळचे मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत ही मदत मागितली होती. या पोस्टमध्ये त्यांनी इस्पितळात उपचार घेतानाचे विलास यांचे काही फोटो पोस्ट केले आणि म्हटलं की, “हा राजा माणूस म्हणजे आमचा लाडका डॉक्टर मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेली सहा वर्ष ब्रेन स्ट्रोकशी झुंज देणारा हा वाघ थोडा थकला आहे. अत्यंत साध्या सदनिकेत राहणारा हा कलाकार आपल्या आयुष्याची सर्व पुंजी या आजारांमध्ये खर्च करुन बसला आणि ती रक्कम थोडी थोडकी नाही. चांगली सुधारणा होत आहे असे वाटत होते, बाहेर पडत होते, कुठे परीक्षक तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून चाहत्यांना दिलासा देत होते. लवकरच आपली सेकंड इनिंग चालू करणार असं वाटत असताना नियती त्यांच्या पुढे दोन मोठ्या आजारांचे निष्ठुर दान टाकून निघून गेली”.
“डॉक्टरांच्या वेदना आपण घेऊ शकत नाही पण प्रेमाची आर्थिक मदत आपण सर्वजण नक्कीच करु शकतो. हे आवाहन मी (राजू कुलकर्णी) डॉक्टरांच्या पत्नी अंजली वहिनी यांच्या अनुमतीने करत आहे. खाली डॉक्टरांचे अकाउंट डिटेल्स देत आहे, तसेच वेळोवेळी डॉक्टरांच्या प्रकृती, त्यांची चालू असलेली ट्रीटमेंट या विषयीची अपडेट मी फेसबुक माध्यमातून आपणास देत राहीन”.
१. डॉ. विलास उजवणे- सारस्वत को.ऑप. बँक अकाउंट नंबर- 130200100009758. IFSC SRCB0000130
२. डॉ. विलास उजवणे- सारस्वत को.ऑप. बँक अकाउंट नंबर- 005200100030302. IFSC सरकॅब००००००५
अशा आशयाची पोस्ट राजू कुलकर्णी यांनी पोस्ट करत विलास यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची हाक दिली. आज विलास उजवणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.