Actor Atul Parchure Passes Away : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अतुल यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच पण त्याचबरोबर इंडस्ट्रीत स्वतःच असं स्थान निर्माण केलं. ही बातमी समजताच अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला. अतुल परचुरे यांच्या अनेक आठवणी समोर येत आहेत. यापैकी एक अविस्मरणीय आठवण म्हणजे कर्करोगावर मात केल्यानंतर अतुल यांनी ‘झी नाट्य गौरव’ सोहळ्याला लावलेली हजेरी.
‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. या ‘झी नाट्य गौरव’ सोहळ्यात अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. अतुल परचुरे यांची ‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार सोहळ्याला खास उपस्थिती पाहायला मिळाली. ‘एका अवलियाची गोष्ट’ असं म्हणत अतुल परचुरे यांची रंगमंचावर झालेल्या एंट्रीला कलाकारांसह, उपस्थितांनाही टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं होतं. यावेळी अतुल परचुरे यांच्यासह सुनील बर्वे, महेश मांजरेकर, आनंद इंगळे या कलाकार मंडळींनी सादरीकरण केलं असल्याचं पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा – Atul Parchure Death : काळ सरकत जातो, आठवणी पुसट होतात पण…; अतुल परचुरेंच्या निधनाने हळहळले सिनेविश्व
यावेळी अतुल परचुरे यांनी केलेलं भाष्य साऱ्यांना भावुक करणार होतं. “बरोबर एक वर्षांपूर्वी मी बरा होऊ शकेन की नाही याची मला स्वतःलाही खात्री नव्हती, पण मी आज इथे आहे तो तुमच्यामुळे आहे”, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांच्या सर्व जवळच्या कलाकार मित्र मंडळींनी त्यांची गळाभेट घेतली. सन्मान झाल्यानंतर अतुल परचुरे यांनी डोकं टेकवून रंगमंचाचा आशीर्वादही घेतला.
प्रेक्षकांच्या आयुष्यात विनोदाला जिवंत ठेवणारे अभिनेते अतुल परचुरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले. अतुल यांनी कर्करोगावर मात करत पुन्हा रंगभूमीवर काम सुरु केलेलं पाहायला मिळालं. अतुल यांच्यावर कर्करोगाचे उपचारही चुकीचे झाल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी सेकंड ओपिनियन घेत नवीन उपचार घेत हा लढा पार पाडला. मात्र त्यांची ही सेकंड इनिंग त्यांना हवी तशी साथ देऊ शकली नाही.