Actor Atul Parchure Died : आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. काही काळापूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. यावर त्यांनी यशस्वी मात करत रंगभूमीवर पुनरागमनदेखील केले होते. मात्र पुन्हा बळावलेल्या आजारामुळे या हरहुन्नरी कलाकाराची प्राणज्योत मालवली. अतुल यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वावरही शोककळा पसरली आहे. (Atul Parchure Death)
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर अतुल यांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टद्वारे शोक व्यक्त करत “अतुल, का रे का का रे. इतक्या लवकर का रे मित्रा?”, असं त्यांनी लिहिलं आहे. लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने “मला माहित आहे… काळ पुढे सरकतो, आठवणी पुसट होतात, पण लख्खं लक्षात राहतो काही माणसांनी खांद्यावर टाकलेला हात, निर्धास्त मनाने वाटून खाल्लेलं पोटभर हसू, बोलताना केलेल्या लोभस खाणाखुणा आणि जग कोळून प्यायलेली त्यांची सूचक, मिश्किल नजर”.
यापुढे त्याने “रोजची भेट नसतानाही आपलीशी वाटणारी माणसं फार कमी असतात, ती अजून कमी झाली की गलबलायला होतं. अतुल दादा, तुझ्या आठवणींना प्रत्येक रसिकाच्या मनात उदंड आयुष्य असणार आहे. खूप खूप प्रेम. खूप खूप आदर” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. अभिनेते वैभव मांगलेंनी “मुंबईत आलो तेव्हा तू पहिला भेटलास, तू धीर येऊन म्हणालास स्वतःवर विश्वास ठेव आणि काम कर. तेव्हापासून सहृदयता जपलीस, तुझ्याकडून खूप प्रेम मिळालं. तुझ्यासारखे पू.ल. झाले नाहीत” अशी आठवण शेअर केली आहे.
दरम्यान, तर जयवंत वाडकरांनी अतुल परचुरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत नुकतीच भेट झाल्याचे सांगितलं आहे. अतुल यांच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. संगीतकार-गायक सलील कुलकर्णी, अभिनेत्री श्रुती मराठे, अभिनेता शशांक केतकर, सिद्धार्थ चांदेकर, पॅडी कांबळे, सचिन व सुप्रिया पिळगावकर, शुभांगी गोखले, सुव्रत जोशी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, गौरव मोरे, सई ताम्हणकर, शरद केळकर अशा अनेकांनी भावुक पोस्ट शेअर केल्या आहेत