Actor Atul Parchure Passes Away : सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा परसरली आहे. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. दोन वर्षांपूर्वी अतुल यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी या आजाराशी दोन हात केले. दरम्यान त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र गेल्या पाच दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. आणि उपचारादरम्यानच काल त्यांची प्राणज्योत मालवली.
अतुल परचुरे यांच्या जाण्याने मराठी कलाविश्वाला मोठा धक्का बसला असून न भरुन निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. अतुल परचुरे यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी दुःख व्यक्त केले. आज (मंगळवार १५ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आता अतुल परचुरे यांना अखेरचं पाहण्यासाठी मराठी कलाविश्वात मंडळींनी गर्दी केली असल्याचं दिसत आहे.
मराठी कलाविश्वात अतुल परचुरे यांचं अग्रगण्य स्थान आहे. अतुल यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांना अखेरचं पाहण्यासाठी कलाकारांनी गर्दी केली आहे. यावेळी सचिन खेडेकर, चंद्रकांत कुलकर्णी, सुबोध भावे, मंदार देवस्थळी, भारत गणेशपुरे, प्रदीप वेलणकर, अरुण कदम, विद्याधर जोशी, सविता मालपेकर, नेहा पेंडसे, सुप्रिया पाठारे ही कलाकार मंडळी उपस्थित आहेत.
नाटक,सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती. मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. इतकंच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुकही झालं होतं. तसेच त्यांनी ‘सुर्याची पिल्ले’ या नाटकाचीही घोषणाही केली होती.