मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार हे अभिनय क्षेत्रात तर कार्यरत आहेतच पण राजकरणातही ते तितकेच सक्रिय आहेत. अशा अनेक कलाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामेदेखील केले आहेत. अमोल कोल्हे हे राजकारण, मनोरंजन या क्षेत्रांसह सोशल मीडियावरदेखील तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मिडियाद्वारे ते अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य करत असतात. अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. (Dr. Amol Kolhe Shared Video On Instagram)
अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटल आहे की, “आज मी पुण्याहून मुंबईला येत होतो. तेव्हा एका चौकात माझी गाडी अडवण्यात आली आणि मला आलेला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. याबद्दल मी स्वत: चौकशी केली असता, त्या महिला पोलिसाने मला तिच्या मोबाईलरील एक मॅसेज दाखवला ज्यात प्रत्येक चौकातून २५,००० रुपयांची वसूली आणि किमान २० गाड्यांची चौकशी ही झालीच पाहिजे असं लिहिण्यात आलं होतं. आणि हे बघून मला धक्काच बसला.” यापुढे त्यांनी या सगळ्यात संबंधित मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे याची मागणी केली आहे. त्याचबरोबर वाहतूक खात्याच्या मदतीने या सरकारकडून केल्या जाणाऱ्या वसुलीचा त्यांनी निषध व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर या व्हिडीओच्याखाली त्यांनी या वसूलीचा हिशोब देत असं म्हटलं आहे की, “मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५,००० × ६५२ = १,६३,००,००० / प्रति दिन. म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपयांची वसूली केली जाते. यामध्ये इतर शहरांच्या वसूलीचा आकडा धरलेलाच नाही. हे नेमकं काय आणि कशासाठी सुरु आहे? अशा पद्धतीने ‘टार्गेट’ देऊन सर्वसामान्य जनतेची लूट का केली जातेय याबाबत संबंधित मंत्रीमहोदय किंवा अधिकाऱ्यांनी खुलासा केलाच पाहिजे. वाहतूक शाखा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीचा अड्डा बनलीय का याची जनतेला माहिती मिळायलाच हवी.” असं म्हणत या सरकारला प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, या पोस्टखाली अनेक नेटकऱ्यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “तुम्ही स्वत: खासदार आहात तुम्ही या सर्व गोष्टींचा मागमूस काढायला हवा, लोकप्रतिनिधी असावा तर असा. दादा नक्की हे कशासाठी? हे आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे, दादा फार वाईट परिस्तिथी आहे, यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे” अशा अनेक कमेंट्स करत त्यांच्या या व्हिडीओला समर्थन दिले आहे.