मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आस्ताद काळेने आपल्या अभिनयाद्वारे चित्रपट, नाटक आणि छोटा पडदा गाजवला आहे. याबरोबरच तो ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाला होता. त्यात त्याच्या खेळीचे चाहत्यांनी कौतुक केले होते. काही दिवसांपूर्वी आस्ताद ‘सुभेदार’ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यात त्याने साकारलेल्या पात्राचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. (Aastad Kale Instagram Post)
आस्ताद अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. या माध्यमातून तो त्याच्या चित्रपटांची माहिती सतत देत असतो. शिवाय त्याच्या खासगी आयुष्यातील क्षण शेअर करण्याबरोबरच विविध मुद्द्यांवरही अनेकदा व्यक्त झालेला आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटोज पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे त्याने दुकानांमध्ये मराठी पाटी नसल्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
हे देखील वाचा – “काही शोमध्ये कलाकारांची खेचली जाते आणि…”, अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “डोक्यात जातात कारण…”
आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटोज शेअर करत एक पोस्ट केली आहे. शेअर केलेला हा फोटो मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या ससुनवघर गावाजवळच्या एका दुकानाचा आहे. त्या दुकानाच्या नावाची पाटी गुजराती भाषेत असल्याचे तो यात म्हणतो. त्यावर संताप व्यक्त करत आस्ताद म्हणाला, “महाराष्ट्रात व्यवसायांच्या पाट्या मुख्यतः मराठीत (त्यांना देवनागरीत म्हणायचंय खरंतर) असाव्यात असे प्रयत्न करणा-यांना मुंबईच्या जरा बाहेरचं हे दिसलं नसेल का?”
त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सहमती दर्शवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्याने प्रतिकिया देताना मराठी फक्त राजकारणापुरती केली जात असल्याचे म्हटलं आहे. अभिनेता आस्ताद काळे आपल्या चित्रपटांसह अनेक मालिका व नाटकांमध्ये दिसलेला आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत झळकला आहे. शिवाय, तो नुकताच बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता.