Abhishek Deshmukh Emotional Post : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने गेली साडे चार वर्षे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मात्र आता ही प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार चर्चेत आले आहेत. मालिका संपणार असल्याचं समोर येताच आता कलाकार मंडळी भावुक होताना पाहायला मिळत आहेत. १९ नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शेवटचं चित्रीकरण पार पडलं, तर ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे.यादरम्यान मालिकेतील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.
समृद्धी बंगल्याबाहेरचा एक सुंदर असा फोटो शेअर करत अभिषेकने असं लिहिलं की, “गुड बाय यश अरुंधती देशमुख. ‘आई कुठे काय करते’च्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस. २०१९ ते २०२४. १४९१ भाग. पॅकअप! ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं, पाच वर्षांपासून बरोबर असलेलं कुणीतरी आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती. निघताना भेटीगाठी झाल्या, आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं. कुणाला तरी भेटायचं राहिलंय असं वाटतच होतं. शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो, मेकअप रूममध्ये, आरशात बघून आलो. पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो. बॅग जराशी जड वाटत होती. निरोप घेताना मी समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की तो माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक. त्याच्याकडे पाठ करुन निघावसं वाटत नव्हतं”.
पुढे अभिषेकने लिहिलं की, “मालिका सुरु झाली म्हणजे कधीतरी संपणार. त्यात काय एवढं? ते फक्त काम आहे, असं शहाण्यांना वाटत असेल पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं. ‘यश’ने मला भरभरुन प्रेम दिलं, ओळख दिली. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक, आपलेपणा, आशीर्वाद उर्जा देणारे होते. टीव्ही या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करुन देणारे अनेक प्रसंग होते. आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे, कारण आई मुलाचं/मुलीचं नातं वैश्विक असतं”.
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदे लवकरच लग्न करणार, थाटामाटात झालं केळवण, फोटो व्हायरल
पुढे अभिषेकने असंही म्हटलं की, “हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन. नमिता तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्याचबरोबर आमचे निर्माते राजन शाही यांचे खूप खूप आभारी आहे. तसंच सर्वात मोठा आभारी स्टार प्रवाहचा. सतीश राजवाडे, आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर, सुबोध बरे, तुषार विचारे, रोहित पाटील आमचे डीओपी राजू देसाई, राजेश मोहीते, एडिटर, कला दिग्दर्शक, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर-गाडगीळ, तुषार जोशी आणि अरुंधतीपासून जानकीपर्यंत सगळे कलाकार”. असं म्हणत त्याने साऱ्यांचे आभार मानले आहेत.