दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत असलेले लक्ष्मीकांत बेर्डे आज शरीराने आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी अविस्मरणीय आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा नवोदित कलाकार मंडळींसाठी नेहमी प्रेरणादायी ठरणारा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट बराच गाजला. त्यानंतर अनेक चित्रपटांतून अभिनयने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. त्यानंतर आता अभिनय एका नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (Abhinay Berde Shared Memory Of His Father)
अभिनय हा लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा असून त्याने अनेकदा आपल्या वडिलांविषयीची आठवण व्यक्त केली आहे. अशातच अभिनयने नुकतीच सन मराठीवरील ‘होऊ दे चर्चा’ या कार्यक्रमात वडिलांबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्याला एक फोटो दाखवण्यात आला. ज्यामध्ये अभिनय लक्ष्मीकांत यांच्या कडेवर असून त्याने एक हात वर केला आहे. या फोटोबद्दल तो असं म्हणाला की, “माझा स्वभाव बघता मी तेव्हा खूप खादाड असेन. त्यामुळे मी काहीतरी खायलाचं मागत असेन”.
यापुढे अभिनयने वडिलांची आठवण सांगत असं म्हटलं की, “त्यांचं नेहमी एक म्हणणं असायचं की, प्रत्येक नवीन कलाकाराने थिएटर केलं पाहिजे, नाटकांमधून काम केले पाहिजे. कारण नाटकांत काम करुन तुम्हाला जी शिकवण मिळते ती दुसरीकडे कधीच मिळणार नाही. ‘आजीबाई जोरात’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे आणि या नाटकाची पहिली घोषणाही त्यांच्याच आवाजात आहे. जी AI च्या माध्यमातून आम्ही आणली आहे. तर ते आज असते आणि त्यांनी माझं पहिलं नाटक बघितलं असतं तर बरं झालं असतं”.
आणखी वाचा – तरुण वयातच नवऱ्याला गमावलं, ५४व्या वर्षीही एकटीच राहते सुप्रसिद्ध अभिनेत्री, आता जगत आहे असं आयुष्य
यापुढे अभिनय असं म्हणाला की, “एकदा पुरुषोत्तम बेर्डे माझं नाटक बघायला आले होते. तेव्हा त्यांनी नाटकाविषयी खास लिहिलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, नाटकाची उद्घोषणा झाल्यानंतर सर्वात आधी स्टेजवर मीच दिसतो. तर असं वाटतं की, जणू काही लक्ष्याच विंगेत उभं राहून आपल्या लेकाला प्रोत्साहन देत आहे”.
दरम्यान, अभिनयच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’ व ‘बॉईज ४’सारख्या चित्रपटांत झळकला आहे. सध्या रंगभूमीवर त्याचे ‘आजीबाई जोरात’ हे नाटक जोरात चालत आहे आणि या नाटकाला प्रेक्षकांकडूनही तुफान प्रतिसाद मिळत आहे.