Aathvi A Web Series Trailer : ‘शाळा’ हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक असतो आणि शाळा म्हटली तर शाळेचा अभ्यासही आलाच. आता या अभ्यासात कुणी खूप हुशार असतो, तर कुणी कमी अभ्यास करणारा किंवा कुणी अगदीच अभ्यास न करणारा म्हणजेच रुढार्थाने ‘ढ’ विधार्थी. शाळेतल्या या ‘हुशार’ आणि ‘ढ’ विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्यातील प्रेम व मैत्री या भावभावनांचं विश्व उलगडून दाखवण्यासाठी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल एक नवी कोरी सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या सीरिजचं नाव आहे ‘आठवी अ’.
नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या सीरिजमध्ये डोंगरावरच्या छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या अभिजीत व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट सांगण्यात आली आहे. आपण ‘आठवी अ’ मध्ये का नाही? आमच्यात काय कमी आहे? सगळ्यांना समान वागणूक का नाही? आपल्यात होणारा बदल नेमका काय आहे? प्रेम म्हणजे काय? मैत्री म्हणजे काय? असे बरेच प्रश्न बालवयात पडत असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ‘आठवी अ’ ही सीरिज.
‘आठवी अ’ या सीरिजची कथा, संवाद व दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले आहे. तर पटकथा नितीन वाडेवाले व नितीन पवार यांनी लिहिली आहे. सीरिजचे सह दिग्दर्शक नितीन वाडेवाले हे आहेत. तर संगीत मंदार पाटील यांनी केले आहे. सीरिजचे छायांकन यश भागरे, स्वप्नील पोळ व अमित चव्हाण यांनी केले आहे आणि कला दिग्दर्शन सोनाली घाडगे यांनी केले आहे. तर निर्मिती प्रमुख विनीत पवार व ध्वनी राजेश्वरी पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर सह संकलनाची जबाबदारी जय लोरे यांनी पार पाडली आहे. तर अथर्व अधाटे, सृष्टी दणाने, ओम पाणस्कर, श्रेयश कटके, सत्यजित होमकर, रुद्र इनामदार, संयोगिता चौधरी व संध्या पवार आदी नवोदित कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
मीडिया वन सोल्युशन्स आणि शौरिन दत्ता निर्मित ‘आठवी अ’ या सीरिजचे प्रोजेक्ट प्रमुख अनंत श्रीवास्तवा व जैमिन शिगवण हे आहेत. तर क्रिएटिव्ह हेड अंकिता लोखंडे असून फायनान्सचा पदभार विशाल मेनारिया यांनी स्वीकारला आहे. दरम्यान, ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, मीडिया वन सोल्युशन्स आणि शौरिन दत्ता निर्मित ‘आठवी अ’ ही नवी कोरी वेबसीरिज येत्या ४ मार्चपासून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘इट्स मज्जा’ या युट्यूब चॅनेलवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येणार आहे.