सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर समोर आले आणि त्यांना कलाक्षेत्रामधूनही प्रसिद्धी मिळाली. एकूणच काय तर सोशल मीडियामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. त्यातील एक गाजलेले आणि सध्या सर्वांच्या परिचयाचे असलेले नाव म्हणजे वर्षा सोळंकी. गाऊनमध्ये सर्वांच्या समोर येणारी स्त्री ते आघाडीची मराठी इन्फ्लुएन्सर असा वर्षाचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना तिने मनोरंजन क्षेत्रामध्ये आपले स्थान निर्माण केले. तिच्या या प्रवासाचे सर्वांनाच कौतुक आहे. सध्या ती हिंदीतील एका डान्स शोमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने आपला आतापर्यंतचा प्रवास सांगितला ज्यामुळे सर्वांचेच डोळे पाणावले. (Varsha Solanki on dance deewane show)
वर्षा सध्या ‘कलर्स वाहिनी’वरील ‘डान्स दिवाने ४’ या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. या कार्यक्रमादरम्याने वर्षाने आपले आजवरचे जीवन किती हालाखीचे होते हे सांगितले. ती म्हणाली की, “लहानपणापासूनच मला जबाबदारीची जाणीव झाली. माझे वडील खूप दारू प्यायचे आणि त्यामुळे त्यांचे घराकडेही दुर्लक्ष असे. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईवर आली. आई लोकांच्या घरी भांडी घासायची त्यातून जे पैसे मिळाले त्यातून तिने मला आणि माझ्या बहिणीला वाढवले. जेव्हा आईला काम करायला जमायचे नाही तेव्हा मी किंवा बहीण भांडी घासायचो. असे दिवस काढत आम्ही मोठ्या झालो. आमची लग्न झाली. मला एक मुलगीही आहे”.
पुढे ती म्हणते की, “मला लहानपणापासूनच नाचायची आवड होती. पण जबाबदाऱ्या आल्याने सर्वच सुटले. पण जसे नवीन ॲप आले तेव्हा मी व्हिडीओ बनवू लागले. लोकांना हसवू लागले. एक दिवशी मला ‘कलर्स वाहिनी’कडून फोन आला आणि मला खूप आनंद झाला. हा मंच मिळाल्यामुळे माझी आवड मी जोपासू शकते”, असे तिने सांगितले.
तिच्या या प्रवासावर कार्यक्रमाचे परीक्षक सुनील शेट्टी यांना गहिवरून आले त्यांनी मंचावर जाऊन तिला धीर दिला. ते म्हणाले की, “तू लोकांना नुसतं हसवत नाहीस तर खूप हसवतेस. तू लोकांना शिकवतेस की पाण्यात पडल्याने माणूस बुडत नाही तर पाण्यात पडून राहल्याने बुडतो. तुम्ही पाण्यातून उठून बाहेर तर या तेव्हा तुम्ही पुढे जाल”, असे तिचे कौतुक केले. त्यानंतर वर्षा धावत माधुरीकडे गेली आणि त्यांना मिठी मारली.