सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात व समाजकारणात अनेक गोष्टी घडत आहेत. अशातच नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लकह करत त्यांच्यावर टीका केली. इतकंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या ब्राह्मण असण्यावरुनही भाष्य केलं आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक लोकांनी प्रतिक्रिया देत आपले मत मांडले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्याबद्दल टीकाही केली आहे.
अशातच आता यावर अभिनेत्री केतकी चितळेनेही सोशल मीडियाद्वारे तिची प्रतिकिया व्यक्त केली आहे. केतकी चितळे ही गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मराठा सर्वेक्षण करायला आलेल्या महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्याआरोबर तिने हुज्जत घातली असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर तिने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकाही केली होती, अशातच आता पुन्हा एकदा तिने मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधला आहे.
आणखी वाचा – ना भरजरी साडी, ना लेहेंगा; लग्नानंतरचा मिसेस बोडकेचा नवा लूक पाहिलात का? साधेपणाने वेधलं लक्ष
केतकी चितळेने तिच्या फेसबुक अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक “महापुरुषांनी” एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली. जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का? या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो. जय हिंद! वंदेमातरम्! भारत माता की जय!”
या पोस्टमध्ये केतकीने कोणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी तिची ही पोस्ट जरांगे पाटलांच्या वक्तव्यावर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, केतकीने केलेल्या या पोस्टवर तिला संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी तिच्या या पोस्टला कमेंट्स करत तिच्यावर टीका केली आहे. तसेच तिच्या या पोस्टमुळे तिला अनेकांनी ट्रोलही केले आहे.