मराठी मालिका, चित्रपट व रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे आस्ताद काळे. आस्तादने ‘पुढचं पाऊल’, ‘अग्निहोत्र’ अशा लोकप्रिय मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आस्तादची पत्नी स्वप्नाली हेदेखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. आस्ताद काळे व स्वप्नाली पाटील ही छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी आहे. सोशल मीडियावर दोघे नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी नुकतेच शेअर केलेले फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
अभिनेत्री व आस्तादची पत्नी स्वप्नाली पाटीलचा नुकताच २५ मार्च रोजी वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचे औचित्य साधत दोघे नवरा-बायको परदेशात फिरायला गेले आहेत. आस्ताद-स्वप्नालीने नुकतेच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोद्वारे तिने आस्तादला धन्यवाद म्हटले आहे. स्वप्नालीने “वाढदिवसानिमित्त सर्वात सुंदर व अप्रतिम भेटवस्तू दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आस्ताद” असं म्हणत पॅरिसमध्ये वाढदिवस साजरा केल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर यापुढे तिने “माझ्या वाढदिवसाच्या खास दिवशी मला शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे खूप खूप आभार” असं म्हणत सर्वांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली आहे. आस्ताद व स्वप्नाली यांनी पॅरिसमधील आयफेल टॉव्हर येथील खास फोटो शेअर केले आहेत. तसेच या फोटोमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाजही पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्वप्नालीने शेअर केलेल्या या खास फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेच्या सेटवर आस्ताद व स्वप्नाली यांची पहिली भेट झाली होती. सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडणं होतं. मात्र हळूहळू प्रेम फुलू लागलं आणि काही वर्ष डेट केल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. ‘बिग बॉस मराठी’मध्ये आस्तादने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर अखेर सप्टेंबर २०२१ साली दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.