‘आई कुठे काय करते’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, देशमुख कुटुंबावर एक संकट गेलं की दुसरं संकट आलेलं असतं. मालिकेत सध्या अनिरुद्ध घराच्या वाटणीसाठी लढाई करताना दिसत आहे. संजनाचं अविचारी बोलणं अनिरुद्धला पटतं आणि तो संजनाचं ऐकून घरासाठी भांडण करतो. तर संजना घरातील इतरांना अनिरुद्धच्या जीवावर जगतो म्हणून खूप ऐकवते. संजना आप्पा आणि कांचनला त्यांच्या खाण्यापिण्यावरुन सतत बोलत असते. (Aai Kuthe Kay Karte Promo)
संजना आप्पा आणि कांचनला त्यांच्या जेवणावरुन बोलून दाखवते. हे काही अरुंधतीला पटत नाही. अरुंधती देशमुखांच्या घरी येत अनिरुद्ध व संजनाला सक्त ताकीद देत सुनावते. अशातच मालिकेच्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, कांचन आजींना बरं नसतं म्हणून त्या लिंबू पाणी पीत असतात. आरोही त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवते. हे संजना पाहते आणि त्यांना साखरेच्या भावावरुन सुनावते.
मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “हे बघा अजून असे किती दिवस राहिले आहेत तुमचे आणि आई-आप्पांचे. जनाची नाहीतर मनाची तरी लाज बाळगा”, असं संजना कांचनला ठणकावून सांगते. संजनांचं टोकाचं बोलण ऐकून कांचनला वाईट वाटतं. अचानक तिच्या छातीतही दुखू लागतं. आणि त्यांना चक्कर येते. त्यानंतर आप्पा लगेचच अरुंधतीला बोलावून घेतात. तेव्हा संजना व अनिरुद्धही तिथे येतात. आप्पा अनिरुद्धवर खूप संतापतात आणि सांगतात तू व तुझ्या बायकोने जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्याचा त्रास कांचनाला होतोय.
यावर अनिरुद्ध बोलतो, तुमचा दोघांचा हट्टीपणा तुम्हाला नडला आहे. यावर अरुंधती अनिरुद्धवर आवाज चढवते आणि सांगते, “बस. आणि तुम्हाला दोघांनाही मी बजावून ठेवतेय. या घरात घरगुती हिंसाचार होतोय अशी पोलिसांत तक्रार करेन मी”, अशी सक्त ताकीद देते.